अकरा महिन्यांच्या चिमुरडीचे छत्र हरपले! मातेविना पोरक्या 'छकुली'च्या क्रंदनाने मारेगाव सुन्न; झुंज ठरली अपयशी
मारेगाव (प्रतिनिधी) : सचिन मेश्राम
मायेची ऊब आणि आईचे छत्र काय असते, हे कळण्याचे अवघे अकरा महिने... अजून तर आईच्या कडेवर खेळायचे दिवस होते; मात्र काळाने असा काही घाला घातला की, अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुरडीच्या शिरावरून मायेचे छत्र कायमचे हिरावले गेले. बाथरुममध्ये गळफास घेतल्यानंतर तब्बल पाच दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या आचल अभिजित मांडवकर (वय २०, रा. प्रभाग १३, मारेगाव) या तरुण महिलेची प्राणज्योत अखेर मालवली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मारेगाव शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमके काय घडले?
प्रभाग १३ मधील मांडवकर कुटुंबातील अवघ्या २० वर्षांची गृहिणी आचल हिने गेल्या ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरातील बाथरुममध्ये स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतला. ज्यावेळी आचलने हे टोकाचे पाऊल उचलले, त्यावेळी तिची ११ महिन्यांची बाळ पाळण्यात गाढ झोपलेली होती. पती घरातच होते. बराच वेळ झाला तरी आचल बाथरुममधून बाहेर न आल्याने पतीने खिडकीतून डोकावून पाहिले असता, आचल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
पतीने तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवले आणि मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिची गंभीर अवस्था पाहून तिला चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
पाच दिवसांची झुंज अखेर अपयशी
गेल्या पाच दिवसांपासून आचल चंद्रपूर येथील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर मृत्यूशी लढा देत होती. डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि कुटुंबीयांच्या प्रार्थना सुरू होत्या; मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर आज मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली आणि एका निष्पाप चिमुरडीचे मातृछत्र हरपले.
‘त्या’ चिमुकल्या जिवाचे काय?
अवघ्या ११ महिन्यांची ती छकुली आता आईच्या स्पर्शाला आणि मायेला पारखी झाली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात आई निघून गेल्याने तिचे निरागस डोळे आईचा शोध घेत आहेत. आचलने एवढा कठोर निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेने संपूर्ण परिसराचे मन हेलावून गेले आहे. तिच्या पश्चात ११ महिन्यांची चिमुरडी, पती आणि सासू असा परिवार आहे.
0 Comments