मारेगांव न्यायालयात धनादेश अनादरण प्रकरणी आरोपी महिलेस ३ महिने कारावास आणि २५ हजारांचा दंड
सचिन मेश्राम- मारेगाव
मारेगांव:कर्ज परतफेडीसाठी दिलेला धनादेश अनादरीत (बाऊन्स) झाल्याप्रकरणी मारेगांव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. के. पी. दवणे यांच्या न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरोपी लता गजानन रामटेके हिला या प्रकरणात दोषी ठरवत तीन महिने कारावास आणि २५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लता रामटेके हिने मारेगांव येथील 'एकविरा महिला बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित' कडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी तिने पतसंस्थेला धनादेश दिला होता. मात्र, पतसंस्थेने सदर धनादेश बँकेत वटवण्यासाठी सादर केला असता, तो खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने अनादरीत झाला.
यामुळे पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. रामकृष्ण झाडे यांनी मारेगांव न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयात चाललेल्या या प्रकरणात सादर करण्यात आलेले साक्ष, पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी लता रामटेके हिला दोषी ठरवले.
दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने आरोपीला ३ महिने कारावास आणि २५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची ही २५,००० रुपयांची रक्कम पीडित एकविरा पतसंस्थेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने पारित केले आहेत.
या प्रकरणात फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने ॲड. पी. एम. पठाण यांनी काम पाहिले.
0 Comments