काळरात्र बनून आला तो सोमवार! चाऱ्यासाठी शेतात गेलेली आई परतलीच नाही; सर्पदंशाने माऊलीचा दुर्दैवी अंत, घोलधरा अश्रूंचा महापूर

काळरात्र बनून आला तो सोमवार! चाऱ्यासाठी शेतात गेलेली आई परतलीच नाही; सर्पदंशाने माऊलीचा दुर्दैवी अंत, घोलधरा अश्रूंचा महापूर






सचिन मेश्राम -मारेगाव 

मारेगाव "आई, लवकर ये रे..." असे म्हणून घरातून निघालेली माऊली पुन्हा कधीच घराची पायरी चढणार नाही, या विचारानेच संपूर्ण घोडदरा गाव सुन्न झाले आहे. जनावरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि संसाराला हातभार लावण्यासाठी शेतात गेलेल्या एका ३२ वर्षीय आईवर नियतीने असा काही क्रूर घाला घातला की, क्षणार्धात एका हसत-खेळत असलेल्या कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला. विषारी सर्पाच्या दंशाने शीतल नंदकिशोर मिलमिले या तरुण माऊलीचा तडफडून मृत्यू झाला आणि दोन निष्पाप बालकांचे छत्र कायमचे हरपले.



सोमवारी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घोडदरा येथील शीतलताई घराशेजारीच असलेल्या प्रमोद पाचभाई यांच्या शेतात म्हशीसाठी हिरवा चारा कापायला गेल्या होत्या. सुखाच्या संसाराची आणि चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून राबणाऱ्या शीतलताईंना कल्पनाही नव्हती की, गवताच्या पात्यांमागे काळाच्या रूपाने मृत्यू दबा धरून बसला आहे. चारा कापत असताना अचानक एका विषारी नागाने त्यांच्या पायाचा वेध घेतला. सर्पदंश होताच शीतलताईंनी मदतीसाठी मारलेली ती शेवटची हाक आजही संपूर्ण शिवारात प्रतिध्वनित होत आहे.



त्यांच्या आकांताचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. जीवाची तगमग होत असताना शीतलताईंना तातडीने मारेगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचाराची पराकाष्ठा केली, मात्र काळाने आपला खेळ पूर्ण केला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित करताच रुग्णालयाच्या आवारात एकच आक्रोश पसरला.
**"आई उठ ना..." चिमुकल्यांच्या टाहोने काळजाचे पाणी झाले**
आईच्या कुशीत विसावण्याच्या वयात आईचा निष्प्राण देह पाहून त्या दोन चिमुकल्यांनी मारलेली हाक आणि फोडलेला टाहो पाहून तेथे जमलेल्या कठोर मनाच्या माणसांचेही डोळे पाणावले. "माझी आई मला सोडून कुठे गेली?" असा प्रश्न विचारणाऱ्या त्या चिमुकल्यांना कसे सांत्वन द्यावे, हे कोणालाच सुचेनासे झाले होते.


कष्टाळू, मनमिळाऊ आणि सदैव हसतमुखाने प्रत्येकाचे स्वागत करणाऱ्या शीतलताईंच्या अकाली जाण्याने मिलमिले कुटुंबावर दुःखाचा डोंगराएवढा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी आणि वृद्ध सासू असा उघड्यावर पडलेला परिवार असून, संपूर्ण घोडदरा गाव आज एका माऊलीच्या विरहाने अश्रूंच्या महापुरात बुडाले आहे.

Post a Comment

0 Comments