दिवसभरात वारंवार ‘ट्रिप’ होणाऱ्या विजेने मारेगावकर हैराण! महावितरण कार्यालयावर संतप्त नागरिकांची धडक
वीज जातेय वारंवार, बिल मात्र भरमसाठ! व्यापारी, बँका अन् सर्वसामान्यांचे कामकाज ठप्प; २२० केव्हीचा प्रश्नही ऐरणीवर
मारेगाव : सचिन मेश्राम
एकीकडे ग्राहकांच्या हातात भरमसाठ वीजबिले आणि दुसरीकडे दिवसभरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, या दुहेरी कोंडीत मारेगाव शहरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. विजेचा लपंडाव इतका वाढला आहे की, दिवसातून असंख्य वेळा वीज ‘ट्रिप’ होत असल्याने महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
वारंवार वीज जाण्यामुळे घरगुती कामकाज तर विस्कळीत होत आहेच; मात्र व्यापारी प्रतिष्ठाने, बँका, ऑनलाइन व्यवहार, लघुउद्योग आणि विविध व्यावसायिकांच्या कामावरही त्याचा थेट परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यवहार रखडतात, ग्राहकांना ताटकळत राहावे लागते आणि व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
या संतापाचा उद्रेक गुरुवारी १३ ऑगस्ट रोजी पाहायला मिळाला. शहरातील त्रस्त वीजग्राहकांनी थेट महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सहाय्यक अभियंता आत्राम यांना निवेदन दिले. वारंवार वीज खंडित होण्यामागील कारणे शोधून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि मारेगावचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
‘आश्वासनांची’ मालिका कधी थांबणार?
मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असूनही शहराला स्थिर वीजपुरवठा मिळत नसल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मारेगावसाठी २२० केव्ही वीज उपकेंद्राची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, मागणीवर ठोस कार्यवाही होण्याऐवजी आश्वासनांचीच पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
वीजपुरवठा यंत्रणेवर वाढता ताण, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असताना संबंधित यंत्रणा केवळ तात्पुरत्या उपायांवर समाधान मानत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
वीज ‘ट्रिप’चा फटका उपकरणांनाही
वारंवार वीज जाणे-येणे यामुळे घरातील विद्युत उपकरणे खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. अचानक वीजपुरवठा खंडित होणे आणि पुन्हा सुरू होणे यामुळे फ्रिज, टीव्ही, संगणक, प्रिंटर तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांचा थेट इशारा—आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही!
वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्यात आली नाही, तर आगामी काळात नागरिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. ग्राहकांकडून वेळेवर वीजबिल वसूल करणाऱ्या महावितरणने त्याच तत्परतेने दर्जेदार व नियमित वीजपुरवठाही द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
यावेळी अजय रायपुरे, दुष्यंत जयस्वाल, अनंत मांडवकर, अनामिक बोढे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत आसुटकर, अंकुश माफुर, गणेश मडावी, प्रकाश म्हसे, प्रदीप मत्ते, विलास रायपुरे, गजु चंदनखेडे, प्रशांत डाखरे, अशोक धोबे, अनिल गेडाम यांच्यासह शहरातील असंख्य त्रस्त वीजग्राहक उपस्थित होते.
आता मारेगावकरांचा एकच सवाल—भरमसाठ वीजबिलांच्या बदल्यात अखेर सुरळीत वीज कधी मिळणार?
महावितरण प्रशासन या प्रश्नावर तातडीने काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
0 Comments