उकणी पुनर्वसनाचा प्रश्न आता निर्णायक वळणावर; वेकोलि सीएमडींची थेट गावात धडक

उकणी पुनर्वसनाचा प्रश्न आता निर्णायक वळणावर; वेकोलि सीएमडींची थेट गावात धडक

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेत बांधावर केली पाहणी; जमीन संपादन, मोबदला आणि पुनर्वसनाबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

वणी : सचिन मेश्राम 
वेकोलिच्या उकणी कोळसा खाण प्रकल्पामुळे वर्षानुवर्षे विविध समस्यांना सामोरे जाणाऱ्या उकणीवासीयांच्या प्रश्नांना आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेकोलिचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. हेमंत शरद पांडे यांनी बुधवारी (१२ ऑगस्ट) उकणी गावाला प्रत्यक्ष भेट देत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे त्यांनी केवळ कार्यालयीन आढावा न घेता थेट शेताच्या बांधावर जाऊन प्रलंबित जमीन संपादनाची पाहणी केली. त्यामुळे उकणीच्या पुनर्वसनासह मोबदला आणि जमीन संपादनाच्या प्रश्नांवर आता ठोस कार्यवाही होण्याची आशा ग्रामस्थांना लागली आहे.

उकणी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खाण प्रकल्पातील सुरुंग स्फोटांमुळे घरांना तडे जाणे, वाढते प्रदूषण, शेतीचे नुकसान आणि प्रलंबित जमीन संपादन अशा विविध समस्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. या प्रश्नांसाठी कामगार नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली उकणी कोळसा खाण व पुनर्वसन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने सातत्याने आंदोलने व पाठपुरावा केला आहे.

सीएमडी थेट गावात; ग्रामस्थांच्या व्यथा ऐकल्या

बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास डॉ. हेमंत पांडे यांनी सहकाऱ्यांसह उकणी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ तसेच संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी ग्रामस्थांनी सुरुंग स्फोटांमुळे घरांना पडणारे तडे, परिसरातील वाढते प्रदूषण, पुनर्वसनाचा प्रश्न, अपुरा मोबदला आणि अद्याप प्रलंबित असलेले जमीन संपादन या प्रमुख समस्या सीएमडींसमोर मांडल्या.

समस्यांचे गांभीर्य लक्षात घेत सीएमडींनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन अद्याप संपादन न झालेल्या जमिनीची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

१७० शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न प्रलंबित

उकणी खंड क्रमांक एकच्या परिसरातील सुमारे १५ टक्के जमीन अद्याप संपादित झालेली नसल्याचा मुद्दा संघर्ष समितीने उपस्थित केला. सुमारे १७० शेतकऱ्यांच्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रलंबित जमीन संपादनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली.

मोबदला बाजारभावानुसार द्यावा

पुनर्वसनासाठी घरांना मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या मोबदल्यात नवीन घर उभारणे शक्य नसल्याचे सांगत मोबदल्याचे फेरमूल्यांकन करून बाजारभावानुसार भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच खाण प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणीही संघर्ष समितीने केली.

‘सीएमडींची प्रत्यक्ष पाहणी हा मोठा दिलासा’ – संजय खाडे

कामगार नेते संजय खाडे म्हणाले, “सीएमडी साहेबांनी स्वतः उकणी गावात येऊन ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली, ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन, मोबदला आणि जमीन संपादनाच्या प्रश्नांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. संघर्ष समिती आणि उकणीवासीयांच्या वतीने त्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार मानतो.”

सीएमडींच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे उकणी पुनर्वसनाचा प्रश्न केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कार्यवाहीच्या दिशेने जाण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

यावेळी कामगार नेते तथा एचएमएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव, संजय खाडे, अर्जून खापणे, विवेक धांडे, कुणाल बोंजे, सागर डांगे, कवडू पचारे, सुहास डाहुले, त्रिकाल ढापकस, अशोक गोवारदिपे, अक्षय ढापकस यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य, उकणीवासी आणि वेकोलिचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments