आईच्या कष्टाचं अन् जिद्दीचं सोनं! हमाली करणाऱ्या बापाचे आजारपण, मजुरी करणारी आई... मारेगावच्या हेमंत बुजाडेची UPSC परीक्षेत ऐतिहासिक झेप!
८ वर्षे बिछान्यावर असलेल्या पतीची सेवा अन् मजुरी करत माऊलीने घडवला देशाचा 'क्लास-१' अधिकारी; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याकडून घरी जाऊन कौतुक
मारेगाव (सचिन मेश्राम):
"आईच्या हातातील काकणांपेक्षा तिच्या हातावरील कष्टाचे आटणे हेच लेकाचे खरे भाग्य असते..." या ओळींची प्रचिती देत मारेगावच्या एका अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने देशाच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या परीक्षेत यशाचा झेंडा फडकवला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत, कौटुंबिक संघर्षाची झळ सोसत हेमंत लता शंकर बुजाडे याने UPSC CAPF AC Exam 2025 मध्ये देदीप्यमान यश संपादन केले आहे. त्याची Assistant Commandant (Class-I Gazetted) या उच्च अन् प्रतिष्ठित पदावर निवड झाली असून, त्याच्या या ऐतिहासिक यशाने संपूर्ण मारेगाव तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर अभिमानाने उंचावले आहे.
13 वर्षे बापाचे बिछान्यावरील आजारपण अन् आईचा अथांग संघर्ष
हेमंतच्या कुटुंबाचा गाडा वडिलांच्या हमालीच्या कष्टावर चालत होता. मात्र, नियतीने क्रूर खेळ खेळला आणि13 वर्षांपूर्वी वडिलांना अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) तीव्र झटका आला. घराचा एकमेव कमावता आधार बिछान्यावर खिळला आणि कुटुंबावर दुःखाचा अन् गरिबीचा डोंगर कोसळला. सलग 13 वर्षे वडिलांनी या आजारपणाशी झुंज दिली.
अशा अत्यंत हताश अन् कठीण प्रसंगी हेमंतची आई लताताई बुजाडे खंबीरपणे उभ्या राहिल्या. एकीकडे सलग 13 वर्षे आजारी पतीची अहोरात्र शुश्रूषा आणि दुसरीकडे कुटुंबाचा उदराग्न शमवण्यासाठी केलेली मजुरी... आईने स्वतःच्या सुखाची आहुती देत, आजोबा आणि मावशीच्या साथीने संसाराचा गाडा हाकला. गरिबीची झळ हेमंतच्या अभ्यासाला अन् स्वप्नांना बसू नये, म्हणून या माऊलीने स्वतःच्या रक्ताचे पाणी केले.
पुण्यात पुस्तकांसाठी मजुरी: संघर्षातून गवसणी
- शिक्षणाचा पाया: हेमंतने १० वी पर्यंतचे शिक्षण मारेगावात, १२ वी वणीच्या SPM कॉलेजमधून, तर इंजिनिअरिंग यवतमाळच्या जगदंबा पॉलिटेक्निक कॉलेजमधून पूर्ण केले.
- पुण्यातील अग्निपरीक्षा: अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हेमंत पुण्याला पोहोचला. राहण्याचा अन् अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी त्याने जिममध्ये काम केले. मात्र, UPSC ची महागडी पुस्तके खरेदी करण्यासाठी ते पैसेही अपुरे पडत होते. ध्येयाने पेटलेल्या हेमंतने मागे न हटता पुस्तकांचे पैसे जमवण्यासाठी प्रत्यक्ष मजुरीचे कामही केले.
"आईचे कष्ट अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा या बळावरच मी अधिकारी झालो!"
आपल्या यशाचे श्रेय देताना हेमंत अत्यंत भावूक झाला. "माझ्या वडिलांचे आजारपण आणि कौटुंबिक गरिबी पाहता माझे शिक्षण सुटण्याची वेळ आली होती. पण माझी आई, आजोबा आणि मावशी यांनी स्वतः अतोनात कष्ट उपसून माझ्या स्वप्नांना पंख दिले. आईच्या डोळ्यांतील अश्रू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा यांमुळेच मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो आहे," असे सांगताना हेमंतचे डोळे भरून आले होते.
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याकडून निवासस्थानी भेट देऊन सत्कार
हमाली अन् मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या लेकाने थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवून देशाचा वर्ग-१ अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. हेमंतच्या या प्रेरणादायी यशाची दखल घेत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज भैया अहिर यांनी बुजाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. शाल अन् पुष्पगुच्छ देऊन हेमंतचा भावूक नागरी सत्कार करण्यात आला आणि त्याच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पावडे, मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, भाजपचे ज्येष्ठ नेते माधव कोहळे, शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, नंदू खापणे, पांडुरंग उंबरकर यांच्यासह लोकप्रतिनिधी अन् नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांसाठी ठरला 'संघर्षाचा दीपस्तंभ'
हलाखीच्या परिस्थितीतून, आई-वडिलांच्या त्यागाच्या जोरावर आणि स्वतः मजुरी करत देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश मिळवणारा हेमंत बुजाडे आज मारेगावसह संपूर्ण विदर्भातील तरुणाईसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरला आहे. आईच्या कष्टाचे सोनं करणाऱ्या हेमंतच्या या यशाचे संपूर्ण परिसरातून भरभरून कौतुक होत आहे.
0 Comments