भाजप ओबीसी मोर्चाच्या मारेगाव तालुकाध्यक्षपदी दयाल मारोती रोगे; समाजसेवेच्या अनुभवाला पक्ष संघटनेची नवी जबाबदारी
गोरगरीबांच्या मदतीला अर्ध्या रात्री धावणारा कार्यकर्ता; तळागाळातील जनतेशी असलेली नाळ ठरली नियुक्तीची जमेची बाजू
सचिन मेश्राम - मारेगाव
मारेगाव : भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या मारेगाव तालुकाध्यक्षपदी दयाल मारोती रोगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्याची आवड, सर्वसामान्य जनतेशी असलेला जिव्हाळ्याचा संपर्क आणि पक्ष संघटनेप्रती असलेली निष्ठा यामुळे रोगे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने मारेगाव तालुक्यातील भाजप ओबीसी मोर्चाला नवे नेतृत्व आणि नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
अर्ध्या रात्रीही मदतीसाठी धावणारा ‘जनतेचा माणूस’
दयाल रोगे हे केवळ राजकीय कार्यकर्ते म्हणून नव्हे, तर गोरगरीब, गरजू आणि संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांच्या मदतीला कोणतीही वेळ न पाहता धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. रात्री-अपरात्री एखाद्या कुटुंबावर संकट आले, गरजू व्यक्तीला मदतीची आवश्यकता भासली किंवा एखाद्या सर्वसामान्य नागरिकाची अडचण निर्माण झाली, तर परिस्थितीची पर्वा न करता मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची भूमिका अनेकांच्या परिचयाची आहे.
याच माणुसकीच्या नात्यामुळे तळागाळातील जनतेशी त्यांची घट्ट नाळ जोडली गेली आहे. राजकारणासोबत समाजकारणाला प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे, ही त्यांच्या कार्याची विशेष ओळख मानली जाते.
वरिष्ठ नेत्यांचा विश्वास; संघटन विस्ताराचे आव्हान
नियुक्तीप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पवन एकरे, वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच भाजप मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वरिष्ठ नेतृत्वाने रोगे यांच्यावर दाखविलेला विश्वास ही त्यांच्या आजवरच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची पावती मानली जात आहे.
ओबीसी समाजाच्या प्रश्नांना मिळणार आक्रमक नेतृत्व
नवीन जबाबदारी स्वीकारताना मारेगाव तालुक्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, गावागावात ओबीसी मोर्चाची संघटना मजबूत करणे आणि युवक व सर्वसामान्यांना पक्षाच्या संघटनेशी जोडणे, यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे.
सामाजिक बांधिलकीतून निर्माण झालेली जनतेची विश्वासार्हता आणि राजकीय संघटनात्मक जबाबदारी यांचा संगम दयाल मारोती रोगे यांच्या रूपाने भाजप ओबीसी मोर्चाला मिळाला आहे. त्यांच्या नियुक्तीचे मारेगाव तालुक्यात स्वागत होत असून, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments