मारेगाव–झरी सीमेवरील गावांना भूकंपाचा सौम्य धक्का; चुनखडक आणि खाण ब्लास्टिंगमुळे भूगर्भीय हालचाली? जिल्हाधिकाऱ्यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मारेगाव–झरी सीमेवरील गावांना भूकंपाचा सौम्य धक्का; चुनखडक आणि खाण ब्लास्टिंगमुळे भूगर्भीय हालचाली? जिल्हाधिकाऱ्यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन



मारेगाव (सचिन मेश्राम):

मारेगाव आणि झरी तालुक्याच्या बाउंड्रीवरील गावांमध्ये सोमवार, दिनांक ८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.१२ वाजताच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.० इतकी नोंदवण्यात आली असून, 'नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी' (NCS) या संस्थेने या भूकंपाची अधिकृत नोंद घेतली आहे. या घटनेत मारेगाव किंवा झरी तालुक्यात कुठेही कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.


​प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू नवरगाव प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला सुरला, केगाव तसेच मारेगाव-झरी सीमेवरील पेंढरी, सुसरी आणि गोधणी या परिसरादरम्यान होता. हा भूकंप अतिशय सौम्य स्वरूपाचा असल्याने आणि नागरिक दिवसभरातील कामांत व्यस्त असल्याने अनेकांना याची जाणीवही झाली नाही. तज्ज्ञांच्या मते, दिवसभरातील हालचालींमुळे असे सौम्य धक्के लक्षात येत नाहीत, मात्र रात्रीच्या वेळी ते अधिक जाणवतात.

चुनखडक आणि कोळसा खाणींचे कारण?



वणी–मारेगाव–झरी हा संपूर्ण परिसर खनिज संपत्तीने समृद्ध असून येथे चुनखडकाचे प्रमाण अधिक आहे. भूगर्भात पाणी गेल्यास चुनखडकाशी त्याची रासायनिक प्रतिक्रिया होऊन सूक्ष्म हालचाली निर्माण होऊ शकतात, ज्यातून असे सौम्य धक्के जाणवतात. त्याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी कार्यरत आहेत. खाणकामादरम्यान होणाऱ्या जड ब्लास्टिंगमुळेही भूगर्भीय हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत भूगर्भशास्त्र अभ्यासक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.

घाबरू नका, अफवा पसरवू नका: जिल्हाधिकारी विकास मीना

भूकंपाची तीव्रता अत्यंत कमी असल्याने नागरिकांनी अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या भीतीदायक अफवा, खोट्या ऑडिओ क्लिप किंवा अप्रमाणित संदेश नागरिकांनी पसरवू नयेत आणि त्यावर विश्वासही ठेवू नये, असे कडक आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.



आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना:

  • ​भूकंपाचे धक्के जाणवल्यास घाबरून न जाता स्वतःला शांत ठेवावे.
  • ​इमारतीमध्ये असल्यास मजबूत टेबल, डेस्क खाली किंवा भिंतीच्या आतील बाजूस सुरक्षित आसरा घ्यावा.
  • ​बाहेर पडताना लिफ्टचा वापर पूर्णपणे टाळावा व धक्के थांबल्यानंतर पायऱ्यांनी सुरक्षितपणे बाहेर पडावे.
  • ​घरातील वीज, गॅस सिलेंडर व इतर उपकरणांची त्वरित तपासणी करून ती सुरक्षित ठेवावीत.
  • ​केवळ अधिकृत प्रशासकीय माहितीवरच विश्वास ठेवावा.

​मारेगाव-झरी तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील नागरिकांना कोणतीही आपत्कालीन परिस्थिती किंवा माहिती द्यायची असल्यास, त्यांनी तात्काळ जिल्हा आपत्ती निवारण कक्ष, यवतमाळ (०७२३२-२४०७२०) किंवा पोलीस नियंत्रण कक्ष (०७२३२-२५६७००) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

Post a Comment

0 Comments