मारेगाव पोलिसांची धडक कारवाई: कोसारा गावातून १४५ अवैध देशी दारूच्या बाटल्या जप्त!

मारेगाव पोलिसांची धडक कारवाई: कोसारा गावातून १४५ अवैध देशी दारूच्या बाटल्या जप्त!


मारेगाव (सचिन मेश्राम):

तालुक्यातील कोसारा गावात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध मारेगाव पोलिसांनी आज सकाळीच धडक कारवाई करत मोठी रेड टाकली. या कारवाईत पोलिसांनी एकूण १४५ देशी दारूच्या बाटल्यांसह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.



​प्राप्त माहितीनुसार, ग्राम कोसारा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मारेगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने आज सकाळी कोसारा येथील अमोल नारनवरे आणि सुलोचना नंदलाल जैस्वाल यांच्या घरावर अचानक छापा (रेड) टाकला.

​या धाडसी कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींच्या घरातून ९० मिली क्षमता असलेल्या एकूण १४५ (१२० + २५) देशी दारूच्या बाटल्या (शिशा) जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची एकूण किंमत ७,१२०/- रुपये असून, पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला आहे. आरोपींवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

या पथकाने केली कारवाई:

सदर धडक कारवाई मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, शंकर बारेकर, पोलीस शिपाई नरेंद्र तुमराम, महिला पोलीस शिपाई बबिता तोडसे आणि चालक अतुल सरोदे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे मारेगाव तालुका परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे आणि मद्यमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

​अवैध धंदे चालवणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments