यवतमाळ विधान परिषद: दुष्यंत चतुर्वेदींची बिनविरोध निवड; मतदारांचा 'लक्ष्मी दर्शना'चा स्वप्नभंग!

यवतमाळ विधान परिषद: दुष्यंत चतुर्वेदींची बिनविरोध निवड; मतदारांचा 'लक्ष्मी दर्शना'चा स्वप्नभंग!



यवतमाळ / मारेगाव:

यवतमाळच्या राजकीय मैदानात लोकशाहीचा उत्सव होण्याऐवजी, पडद्यामागच्या 'सेटिंग'चा कुबट वास सर्वत्र दरवळला आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड म्हणजे जनतेच्या मतांचा विजय नसून, बड्या राजकीय नेत्यांनी छुप्या तडजोडीतून उरकलेला 'विवाह' ठरला आहे. या प्रक्रियेत एका बाजूला लोकशाहीचा बळी गेला असताना, दुसरीकडे 'घोडेबाजारा'त स्वतःची बोली लागण्याची वाट पाहणाऱ्या नगरसेवकांचे 'मुंगेरीलालचे हसीन सपने' खाक झाले आहेत.

​उमेदवारांची पळपुटी की 'अर्थपूर्ण' शरणागती?

​सुरुवातीला रणशिंग फुंकणारे महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे यांनी ऐनवेळी संख्याबळाचे रडगाणे गात मैदानातून पळ काढला. विशेष म्हणजे, ज्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष होते, त्या भाजपच्या नितीन भुतडा यांनीही गुरुवारी (४ जून) गुपचूप आपला अर्ज मागे घेतला. एकामागून एक उमेदवारांनी घेतलेली ही माघार म्हणजे जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेला त्याग नसून, उच्चपदस्थ नेत्यांच्या पातळीवर झालेली 'Give and Take' ची सेटिंग असल्याची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. यामुळे निवडणुकीतील 'चुरस' संपली आणि 'राजकीय लाचारी' विजयी झाली.

​'नगदी' स्वप्ने धुळीस; नगरसेवकांची अवस्था 'पाण्याविना मासा'!

​निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक नगरसेवकांच्या डोळ्यासमोर 'गुलाबी नोटांचे' बंडल नाचू लागले होते. ही निवडणूक म्हणजे आपली उधारी भागवण्याची आणि नवीन गाड्या दारात उभी करण्याची 'दुभती गाय' आहे, असे स्वप्न मारेगावसह संपूर्ण जिल्ह्यातील नगरसेवकांनी पाहिले होते.

  • बजेट फेल: अनेकांनी तर साहेबराव कांबळेंच्या दौऱ्यातच स्वतःचे भाव वधारून घेतले होते. बँकांचे हप्ते आणि खाजगी उधारी फेडण्यासाठी ज्यांनी आधीच व्याजाने पैसे उचलले होते, त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे.
  • अजब मागणीचा निर्लज्जपणा: "आम्हाला मतदानाचा अधिकार द्या," असा टाहो फोडणारे नगरसेवक प्रत्यक्षात लोकशाहीसाठी नाही, तर 'लक्ष्मी दर्शना'साठी तडफडत आहेत. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे यांचे 'दुकान' उघडण्यापूर्वीच बंद झाले आहे.

​राजकीय कट्ट्यांवर 'थुंकी' झेलण्याची वेळ

​"पाऊस पडायच्या आधीच छत्र्या विकत घेणाऱ्या" या लोकप्रतिनिधींची आता जिल्ह्यात चांगलीच छी-थू होत आहे. "बिनविरोध निवड झाली की जिल्ह्याचा विकास होतो," असा गोड गैरसमज पसरवला जात असला, तरी प्रत्यक्षात ही निवडणूक म्हणजे सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक आणि नगरसेवकांच्या खिसेभरू वृत्तीला बसलेला जोरदार चपराक आहे.

​दुष्यंत चतुर्वेदी आता विधान परिषदेत पोहोचले असले, तरी त्यांच्या निवडीवर 'सेटिंगचा शिक्का' आणि नगरसेवकांच्या तोंडावर 'हवालदिलपणाचा रंग' कायमचा उमटला आहे.

Post a Comment

0 Comments