किंन्हाळा येथे घरकुल लाभार्थ्यांची परवड; हप्ते रखडल्याने ऐन पावसाळ्यात गरिबांची घरे उघड्यावर!​

किंन्हाळा येथे घरकुल लाभार्थ्यांची परवड; हप्ते रखडल्याने ऐन पावसाळ्यात गरिबांची घरे उघड्यावर!

मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात मारेगाव गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; अपूर्ण घराला कागदोपत्री 'पूर्ण' दाखवून निधी लाटल्याचा संशय; चौकशीची मागणी



मारेगाव (सचिन मेश्राम): तालुक्यातील किंन्हाळा येथे शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत मंजूर झालेल्या घरांचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न अंधातरी रखडले आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता न मिळाल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गोरगरीब लाभार्थ्यांची प्रचंड परवड होत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. मारोती गौरकार यांच्या नेतृत्वाखाली किंन्हाळा येथील ग्रामस्थांनी मारेगावचे गटविकास अधिकारी (BDO), पंचायत समिती यांना एक सविस्तर लेखी निवेदन सादर करून रखडलेले हप्ते तात्काळ देण्याची आग्रही मागणी केली आहे.

​किंन्हाळा गावामध्ये सध्या शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि मोदी आवास योजना या तिन्ही योजनांच्या माध्यमातून सुमारे २० ते २५ घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक लाभार्थ्यांना केवळ पहिलाच हप्ता मिळाला आहे, तर काहींना दुसरा हप्ता मिळून पुढील रक्कम रखडली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्याने अनेकांनी आपली जुनी मातीची घरे पाडून, उसने-पासने करून किंवा कर्जबाजारी होऊन नव्या घरांचे बांधकाम भिंतींपर्यंत आणून ठेवले आहे. आता पुढील हप्ते न मिळाल्यामुळे कामे ठप्प झाली असून अनेक कुटुंबे छप्पराअभावी उघड्यावर आली आहेत. लाभार्थी जेव्हा पंचायत समिती कार्यालयात चौकशीसाठी चकरा मारतात, तेव्हा "वरून निधी आलेला नाही, निधी आल्यावर पैसे जमा होतील" असे मोघम उत्तर देऊन त्यांची दिशाभूल केली जाते, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

​या निवेदनात ग्रामस्थांनी प्रशासकीय पातळीवरील एका गंभीर विसंगतीवर बोट ठेवले आहे. गावातील एक लाभार्थी यांचे घर प्रत्यक्षात आजही पूर्णपणे अपूर्ण आणि अर्धवट अवस्थेत आहे. असे असतानाही, कागदोपत्री हे घर 'पूर्ण' दाखवून त्यांचे चारही हप्ते आणि वाढीव हप्ता देखील खात्यात जमा करण्यात आला आहे. इतर गरजू लाभार्थ्यांना निधी नसल्याचे कारण सांगताना, एका अपूर्ण घराला पूर्ण दाखवून निधी कसा वितरित झाला? यात कोणाचा वरदहस्त आहे? याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

​जर प्रशासनाने पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व सामान्य आणि गरजू लाभार्थ्यांचे थकीत हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा केले नाही, तर किंन्हाळा ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

​या निवेदनावरील स्वाक्षरीकर्त्यांमध्ये मारोती गौरकार यांच्यासह मुकुंदा आडे, मनोज कडुकर, दामोदर कडुकर, श्रीराम घोडम, रुखमाबाई उईके, जोती कटवते तसेच विठोबा बांदूरकर, विठ्ठल सिडाम, शामजी ढवकर, राजू मरस्कोल्हे, छगन भोयर, मारोती मडावी, दिलीप आडे, राजू आडे, प्रेमदास क्षीरसागर, महादेव मडावी, गुणवंत येरमे, शकुंतला उईके यांसह किंन्हाळा येथील बहुसंख्य नागरिक व महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments