मारेगाव पोलिसांची सोनुपोड शिवारात धडक कारवाई; दोन गुन्हे दाखल, १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

मारेगाव पोलिसांची सोनुपोड शिवारात धडक कारवाई; दोन गुन्हे दाखल, १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

मारेगाव,: सचिन मेश्राम 

मारेगाव तालुक्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून, पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सोनुपोड (सराटी) परिसरात दोन ठिकाणी छापेमारी करून अवैध हातभट्टी दारू व मोहमाच सडवा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या कारवाईत सोनुपोड फाट्याजवळील शेत परिसरात आरोपी मंतु गुलाराम आत्राम (वय ३२) याने नाल्यात लपवून ठेवलेले १५ प्लास्टिक कॅन पोलिसांच्या हाती लागले. तपासणीअंती त्यामध्ये २२५ लिटर मोहमाच सडवा आढळून आला. सुमारे १२ हजार रुपये किमतीचा हा सडवा पंचांसमक्ष जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत सोनुपोड येथील बंडू भीमा आत्राम (वय ३४) हा आपल्या राहत्या घरातून गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार घराची झडती घेतली असता लाकडी बेडखाली लपवून ठेवलेली १४ लिटर गावठी दारू आढळून आली. या प्रकरणात १ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दरवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्यासह पीएसआय प्रमोद जिद्देवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ता किन्नाके, दिगंबर किन्नाके, पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत कोरवते, पोलीस शिपाई विकास खंदारे आणि महिला पोलीस अंमलदार अरुणा पायलवार यांनी सहभाग घेतला.
अवैध दारू व्यवसाय व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments