​सग्नापूर सुन्न: लग्नाचा मांडव सुटण्यापूर्वीच उठली दोन सरणं; पोटच्या गोळ्यांनी पोटालाच दगड बांधून संपवलं आयुष्य!

​सग्नापूर सुन्न: लग्नाचा मांडव सुटण्यापूर्वीच उठली दोन सरणं; पोटच्या गोळ्यांनी पोटालाच दगड बांधून संपवलं आयुष्य!

​मारेगाव (सचिन मेश्राम): "ज्या हातांची लग्नाची मेहंदी अजून पूर्ण उतरली नव्हती, ज्या गळ्यातलं मंगळसूत्र अजून नवं कोरे होतं... त्याच हातांना आणि गळ्याला काल मृत्यूचा विळखा बसला. महिनाभरापूर्वी ज्या लेकरांना अक्षता लावून सुखी संसाराचा आशीर्वाद दिला, त्याच पोटच्या गोळ्यांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह विहिरीतून बाहेर काढताना बापाने फोडलेला हंबरडा आणि आईने


 केलेला आक्रोश ऐकून काल सग्नापूरची काळी मातीही रडली."
​मारेगाव तालुक्यातील सग्नापूर येथील आशिष धानोरकर आणि करिश्मा धानोरकर या नवविवाहित पती-पत्नीने पोटाला जड दगड बांधून विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. काल रात्री घडलेल्या या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण मारेगाव तालुका सुन्न झाला असून, बातमी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा कंठ दाटून येत आहे.
​मेहंदीचा रंग गडद होता, पण नियती क्रूर निघाली! अवघ्या महिन्याभरापूर्वी, ४ मे रोजी या दोघांचं लग्न झालं होतं. घरासमोर लागलेला लग्नाचा मांडव अजून पूर्ण निघालाही नसेल, नात्यातले गोडधोड दिवस अजून संपलेही नव्हते. दोघंही एकमेकांच्या साथीने नव्या आयुष्याची स्वप्नं पाहत होते. पण कुणाला ठाऊक होतं, की काल ८ जूनची रात्र या संसाराचा कायमचा शेवट करणार आहे? रात्री साडेआठ वाजता दोघंही दुचाकीवरून घराबाहेर पडले, ते थेट मृत्यूच्या दारात जाण्यासाठीच...
​मरतानाही सुटली नाही साथ; पोटाला बांधला जड दगड! विहिरीच्या काठावर उभे असताना, त्या काळोख्या रात्री मृत्यूला समोर पाहताना त्यांच्या मनात नेमकी काय घालमेल झाली असेल? पाण्यात पडल्यावर जीव वाचवण्यासाठी हातपाय मारू नयेत आणि मृत्यू निश्चित व्हावा, म्हणून त्या दोघांनीही आपल्या पोटाला दोरीने जड दगड बांधले आणि विहिरीच्या अथांग, थंडगार पाण्यात उडी घेतली. मरतानाही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.
​रात्री उशिरापर्यंत दोघं घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. शेतातील विहिरीजवळ दुचाकी दिसली आणि बापाच्या काळजाचा ठोका चुकला. रात्रीच्या अंधारात जेव्हा गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून ते दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एकाही पोलिसाच्या आणि नागरिकाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
​हसत्या संसाराची राखरांगोळी; कारण मात्र कायमचं संपलं! घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्याम वानखेडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
​लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच या कोवळ्या जिवांनी असं कोणतं दुःख मनात लपवून हा टोकाचा निर्णय घेतला? हा प्रश्न आता अनुत्तरितच राहिला आहे. सुखी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या या दोन जिवांचा असा करुण अंत पाहून आज पूर्ण जिल्हा हळहळत आहे. मारेगाव पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत

Post a Comment

0 Comments