मार्डा डॅममधील अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; २४ तासांत खुनाचा छडा, ३ आरोपींना अटक
मारेगाव व शिरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई; सहायक फौजदार दिगंबर किनाके यांच्या चातुर्यामुळे आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव: मार्डा डॅमच्या जंगलातील खड्ड्यात फेकलेल्या एका कुजलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ मारेगाव पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार दिगंबर लक्ष्मण किनाके यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आणि अचूक तपासाच्या जोरावर अवघ्या २४ तासांत उकलले आहे. बहिणीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी ३ जणांनी संगणमताने हा खून केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी सहायक फौजदार दिगंबर किनाके यांच्या लेखी फिर्यादीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा शोधला तपासाचा धागा दिनांक ५ जून २०२६ रोजी दांडगाव शिवारातील गौतम ठमके यांच्या शेतालगत असलेल्या मार्डा डॅमच्या जंगलात एका खड्ड्यात एक कुजलेला, दुर्गंधीयुक्त अनोळखी पुरुषाचा मृतदेह (वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे) आढळून आला होता. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे आणि सहायक फौजदार दिगंबर किनाके यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळ गाठले. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर पंचांसमक्ष मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला.
घटनास्थळाची बारकाईने पाहणी करताना मृतकाच्या हातातील पांढऱ्या धातूचे कडे आणि जवळ सापडलेली तंबाखूची प्लास्टिक डबी या दोन गोष्टी सहायक फौजदार किनाके यांनी तपासाचा मुख्य धागा बनवल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समांतर तपास सुरू झाला असता, किनाके यांनी मृतकाच्या वस्तूंचे फोटो घेऊन वरोरा परिसर पिंजून काढला आणि मृतकाचे कुटुंब शोधून काढले. मृतक हा विनोद प्रल्हादराव सहारे (वय ३५, रा. मरेगाव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) असल्याचे निष्पन्न झाले.
शिरपूर पोलिसांची कारवाई; चौकशीत आरोपी झाले 'पोपट'या गुन्ह्याचा समांतर तपास करत असलेल्या शिरपूर पोलीस ठाण्याच्या पथकातील स.पो.नि. संतोष मनवर व सहकाऱ्यांनी तांत्रिक बाबींच्या आधारे तीन संशयित आरोपींना निष्पन्न करून ताब्यात घेतले आणि मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर सहायक फौजदार दिगंबर किनाके यांनी मृतकाची ओळख आणि भक्कम पुरावे समोर ठेवून आरोपींना विश्वासात घेऊन कसून विचारपूस सुरू केली. किनाके यांच्या चौकशीचा पोलिसी खाक्या पाहताच आरोपींनी पोलिसांसमोर पोपटासारखे बोलू लागत गुन्ह्याची सविस्तर कबुली दिली.
छेडछाडीच्या रागातून केला खून मृत विनोद सहारे हा मुख्य आरोपीच्या बहिणीला तिच्या नागरी (ता. वरोरा) येथील घरी जाऊन वारंवार त्रास देत होता. याच छेडछाडीच्या रागातून आरोपींनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. ३ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता आरोपींनी विनोदला वरोरा रेल्वे स्टेशनवरून दुचाकीवर बसवले आणि मार्डा डॅमच्या जंगलात आणले. तिथे दुपारी १:३० ते २:०० वाजेच्या सुमारास तिघांनी संगणमत करून विनोदचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत जंगलातील खड्ड्यात फेकून दिले.
अटकेतील आरोपी:१) प्रविण अशोक वरधने (वय ३५ वर्षे, रा. आपटी, ता. मारेगाव)२) राजु नथ्थुजी ढेंगळे (वय ३५ वर्षे, रा. दांडगाव, ता. मारेगाव, जि. यवतमाळ)३) शंतनु झाडे (वय १८ वर्षे ४ महिने, रा. नागरी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर)
पोलीस पथकाची कामगिरी मारेगावचे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिगंबर किनाके, पो.उप.नि. प्रमोद जिद्देवार, पो.शि. सागर दीपेवार, राजन इसंकर, तसेच शिरपूर पोलिसांचे स.पो.नि. संतोष मनावर, पो.हवा. इकबाल शेख व अजय वाभिटकर यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी बजावली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वानखेडे करीत आहेत.
0 Comments