छात्र भारतीचा एकदिवसीय विद्यार्थी परिसंवाद वर्धा येथे उत्साहात संपन्न

छात्र भारतीचा एकदिवसीय विद्यार्थी परिसंवाद वर्धा येथे उत्साहात संपन्न
रोहन आदेवार- वर्धा 

वर्धा: छात्र भारती वर्धा विभागाच्या वतीने दि. ७ जून रोजी वर्धा येथे एकदिवसीय विद्यार्थी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, विद्यार्थ्यांचे हक्क, शिक्षण व्यवस्थेतील बदल तसेच विद्यार्थी संघटनांच्या भूमिकेवर चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाला वर्धा जिल्ह्यातील युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
परिसंवादासाठी छात्र भारतीचे राज्याध्यक्ष अनिकेत घुले, राज्य सचिव प्रशांत खंदारे आणि राज्य संघटक विशाल शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, बदलती शैक्षणिक धोरणे आणि विद्यार्थ्यांसमोरील विविध आव्हाने यांवर सविस्तर भाष्य केले. तसेच विद्यार्थी चळवळींचे महत्त्व आणि संघटित विद्यार्थी शक्तीची आवश्यकता अधोरेखित केली.

परिसंवादादरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षण, रोजगार, शिष्यवृत्ती, महाविद्यालयीन समस्या, स्पर्धा परीक्षा आणि संघटनात्मक कार्य यासंदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रमुख मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत संघटना आणि विद्यार्थी म्हणून या प्रश्नांवर प्रभावीपणे कसे काम करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांशी संबंधित विषयांवर चिंतन-मंथन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लोकशाही मूल्ये, सामाजिक बांधिलकी, समान शिक्षणाच्या संधी आणि संघटनात्मक जाणीव यांबाबत आपले विचार व्यक्त केले. या परिसंवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होऊन अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा घडून आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल दरणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आकाश कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कौस्तुभ पाचडे, आदित्य दरणे, प्रणय चहांदे, जय गौरखेडे, सुयोग शेंडे, मयूर बालपांडे आणि हर्ष पट्टेवार, शुभम सोळंकी, सुरज मॅडमवार, शुभम मोरे, हिमांशु गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा परिसंवाद यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संघटनात्मक जाणीव, सामाजिक भान आणि शैक्षणिक प्रश्नांबाबत सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Post a Comment

0 Comments