महिलांना ढाल करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणारा 'तो' 'भाडखाऊ मामा' रडारवर!
पोलीस अधिकाऱ्याच्या वरदहस्ताने तालुक्यात उच्छाद; हजार-दोन हजारांसाठी शासकीय विभागांना धमकावणाऱ्या दलालाचा पर्दाफाश होणार?
मारेगाव (सचिन मेश्राम):तालुक्यातील विविध शासकीय विभागांमध्ये स्वतःचा वचक दाखवून, गरजू महिलांची ढाल करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका कुप्रसिद्ध 'भाडखाऊ मामा'चा कारनामा आता चव्हाट्यावर आला आहे. पोलीस विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संधान साधून या दलालाने शिक्षण, आरोग्य, पंचायत, आणि बांधकाम विभागासह राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांना वेठीस धरण्याचे सत्र चालवले असून, या विकृत प्रवृत्तीमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
...आणि तो वाघासारखा चकरा मारू लागतो!
मिळालेल्या माहितीनुसार, या तथाकथित 'मामा'ची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध आणि घातक आहे. पंचायत समिती, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग किंवा एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये एखाद्या महिलेचे काही काम अडकले असल्यास, हा महाशय तिला मदत करण्याच्या बहाण्याने सोबत घेतो. त्यानंतर, त्या महिलेचे काम करून घेण्याच्या नावाखाली संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये 'वाघासारख्या' चकरा मारणे सुरू होते.
खोट्या आरोपांची भीती आणि 'हजार-दोन हजारांची' खंडणी
कामाच्या बहाण्याने अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करणे, खोट्या तक्रारींची किंवा अब्रुनुकसानीची भीती दाखवणे ही या दलालाची मुख्य पद्धत आहे. विशेष म्हणजे, मोठा आव आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केल्यानंतर, हे प्रकरण अवघ्या हजार-दोन हजार रुपयांच्या तडजोडीवर (सेटलमेंट) मिटवले जाते. कायदेशीर कटकट आणि नाहक बदनामी नको, म्हणून अनेक अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक अशा प्रवृत्तीला बळी पडत असून गपचूप पैसे देऊन सुटका करून घेत असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस अधिकाऱ्याचा छुपा पाठिंबा?
या संपूर्ण गोरखधंद्यात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत संशयास्पद असल्याची चर्चा आहे. या 'भाडखाऊ मामा'ला पोलीस प्रशासनातील एका अधिकाऱ्याचा थेट पाठिंबा असल्यानेच त्याचे मनोधैर्य वाढले असून, तो कोणालाही न जुमानता शासकीय कार्यालयांमध्ये उच्छाद मांडत आहे. पोलिसांचाच आश्रय असल्यामुळे बाधित अधिकारी देखील उघडपणे तक्रार करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.
महिलांचा गैरवापर आणि प्रशासनाचे खच्चीकरण
आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी हा दलाल गरजू महिलांचा केवळ 'वापर' करत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे एका बाजूला महिलांची सुरक्षा आणि आत्मसन्मान धोक्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे.
या खंडणीखोर प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आता तालुक्यातील सर्व बाधित विभागांनी आणि सुजाण नागरिकांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. या दलालावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर वरिष्ठ पातळीवरून कधी कारवाई होणार? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments