टाकळी–दहेगाव पांदण रस्त्याची दुरवस्था संपणार? आमदार संजय देरकर यांना साकडे!​

टाकळी–दहेगाव पांदण रस्त्याची दुरवस्था संपणार? आमदार संजय देरकर यांना साकडे!

​रोहन आदेवार यांचे निवेदन; निधी उपलब्ध करून तातडीने पक्कीकरण करण्याचे आमदारांचे आश्वासन

​मारेगाव (सचिन मेश्राम):
मारेगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या टाकळी येथील ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, टाकळी–दहेगाव या अत्यंत महत्त्वाच्या पांदण रस्त्याच्या पक्कीकरणासाठी रोहन राजू आदेवार यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार संजयजी देरकर यांची भेट घेऊन त्यांना रीतसर निवेदन सादर करण्यात आले.
​आरोग्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांची कोंडी!
​टाकळी गाव हे भौगोलिकदृष्ट्या तालुक्याच्या शेवटच्या सीमेवर असल्याने ग्रामस्थांना मूलभूत सोयी-सुविधांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. शेजारील राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) असल्याने, टाकळी येथील नागरिकांना तातडीच्या उपचारासाठी याच पांदण रस्त्याचा प्रामुख्याने वापर करावा लागतो. यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांची शेतशिवारे याच मार्गावर असल्याने त्यांच्यासाठी हा रस्ता जीवनवाहिनी मानला जातो.
​पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य; प्रवास बनला जीवघेणा
​सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून जागोजागी खड्डे आणि रस्ता उखडलेल्या अवस्थेत आहे. पावसाळा सुरू होताच या पांदण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते, ज्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने तर दूरच, पण साधी बैलगाडी घेऊन जाणेही अशक्य होते. ऐन पावसाळ्यात कोणाची प्रकृती खालावल्यास दवाखान्यात पोहोचणे कठीण होते, तर शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
​तरुण नेतृत्वाचा पुढाकार; आमदार देरकर यांचा सकारात्मक प्रतिसाद
​ग्रामस्थांची ही वर्षानुवर्षांची गैरसोय दूर व्हावी यासाठी गावातील जागरूक तरुण रोहन राजू आदेवार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आमदार संजय देरकर यांची भेट घेऊन रस्त्याच्या पक्कीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली.
​ग्रामस्थांची अडचण आणि रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार संजयजी देरकर यांनी यावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित योजनेचा निधी उपलब्ध होताच या रस्त्याचे काम तातडीने प्राधान्याने सुरू करण्यात येईल, असे ठोस आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले आहे. आमदारांच्या या आश्वासनामुळे आता टाकळी-दहेगाव रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याच्या आशेने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments