मारेगाव विद्युत विभागाचा भोंगळ कारभार; नागरिक अंधारात! दहा-दहा मिनिटांनी वीज गुल, ग्राहक हैराण
‘लोहे साहेब, फक्त वसुली नाही तर लाईन पण पहा!’; ग्राहकांचा संताप अनावर, तालुक्यात उद्रेकाची स्थिती
सचिन मेश्राम- मारेगाव
मारेगाव तालुक्यातील विद्युत विभागाच्या कारभाराचा पुरता बोजवारा उडाला असून, महावितरणच्या गलथान धोरणामुळे संपूर्ण तालुका अक्षरशः अंधारात चाचपडत आहे. शहरासह ग्रामीण भागात दर दहा-दहा मिनिटांनी वीज गुल होत असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. एका बाजूला वीज व्यवस्थेची पार दुरवस्था झालेली असताना, दुसरीकडे मात्र वसुलीसाठी ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात मारेगावकरांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.
दहा-दहा मिनिटांनी वीज गायब; ग्राहक त्रस्त
दिवसातून वीस वेळा वीज जाणे-येणे हा येथील ग्राहकांसाठी नित्याचाच ताप बनला आहे. या लपंडावामुळे घरगुती ग्राहकांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक होत असून व्यापारी, छोटे व्यावसायिक, विद्यार्थी आणि शेतकरी संकटात सापडले आहेत. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची साधी तसदीही विभाग घेत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
‘लोहे साहेब, खुर्चीत बसून वसुली नको, फिल्डवर उतरून लाईन पहा!’
तालुक्यातील या बिकट परिस्थितीवर संताप व्यक्त करताना ग्राहकांनी थेट अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. ‘लोहे साहेब, वसुलीचा हिशोब कागदावर मांडणे सोपे आहे, कधीतरी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून तालुक्यातील लोंबकळणाऱ्या आणि नादुरुस्त झालेल्या लाईनची काय अवस्था आहे ते पहा,’ असा संतप्त टोला नागरिक लगावत आहेत. वसुलीच्या वेळेस दाखवली जाणारी अफाट तत्परता ही लाईन मेंटनन्स आणि वीज पुरवठा सुरळीत करताना कुठे गायब होते? असा तिखट सवाल आता विचारला जात आहे.
'वसुलीत पुढे, पण सेवेत शून्य!'
जिल्ह्यात वसुलीच्या आघाडीवर राहून पाठ थोपटून घेणाऱ्या विद्युत विभागाला अखंड वीज देण्याची मात्र लाज वाटते का, अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दरमहा वेळेवर बिल भरूनही जर दहा-दहा मिनिटांनी अंधारात बसावे लागत असेल, तर या निकृष्ट सेवेला जबाबदार कोण?
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मारेगाव तालुक्यातील या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन नादुरुस्त वीजवाहिन्यांची पाहणी करावी आणि वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा संतप्त ग्राहकांचा हा उद्रेक थेट महावितरण कार्यालयाच्या उंबरठ्यावर धडकल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा नागरिकांनी दिला आहे.
0 Comments