शिक्षक दिनीच शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे! मारेगावात भ्रष्ट मुख्याध्यापक-शिक्षकाच्या १० लाखांच्या महाघोटाळ्याविरोधात आमरण उपोषणाचा महाभडका!
सत्कार कसला करता, आधी चोरांना बेड्या ठोका! भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या कर्तव्यदक्ष शिक्षकावरच खोट्या गुन्ह्यांचा कट; १२ सदस्य व पालकांचे पंचायत समितीसमोर थेट कफन बांधून आंदोलन
सचिन मेश्राम - मारेगाव
मारेगाव : ५ सप्टेंबर 'शिक्षक दिन'... राज्यभरात शिक्षकी पेशाचा उदोउदो आणि सत्कार सोहळे झडत असताना, मारेगाव पंचायत समितीच्या उंबरठ्यावर मात्र शिक्षण क्षेत्राच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत! स्थानिक पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मारेगाव येथे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्काचा तब्बल १० लाख रुपयांचा शासकीय निधी गिळंकृत करणाऱ्या मुख्याध्यापक मुकुंदा परचाके आणि शिक्षक विलास ठोंबरे यांच्या काळ्या कारभाराविरोधात संतापाचा तीव्र उद्रेक झाला आहे. या महाघोटाळ्याची पोलखोल करणाऱ्या प्रामाणिक शिक्षक संजय आत्राम यांना गोवण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांमार्फत रचलेला बदनामीचा कट उघडकीस आल्यानंतर, संतप्त शाळा व्यवस्थापन समितीचे (SMC) सर्व १२ नवनिर्वाचित सदस्य आणि पालकांनी आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून मारेगाव पंचायत समितीसमोर 'आरपारची लढाई' पुकारत बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंचित बहुजन समाज पार्टीचे नेते राजू निमसटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व विनम्र अभिवादन करून करण्यात आली. य
या बेमुदत आमरण उपोषणात शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित १२ सदस्य सचिन मेश्राम, अशोक पवार, महादेव कोवे, कविता बोढाले, किरण ढोके, विनोद हेपट, मंजुषा बोढाले, भारती मस्के, ज्योत्स्ना भोयर, अतुल वरटकर, जफर शेख आणि शितल गरड हे थेट मैदानात उतरले असून त्यांच्यासमवेत मोठ्या संख्येने पालक वर्गही उपस्थित आहे. या महाघोटाळ्याची सविस्तर तक्रार शालेय शिक्षण मंत्र्यांसह यवतमाळ पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पुराव्यांच्या पुडक्यांसह सादर करण्यात आली आहे.
१७ लाखांतून १० लाखांचा थेट दरोडा; विद्यार्थ्यांच्या नशिबी घाण आणि नरकयातना!
शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि भौतिक सुविधांसाठी पीएमश्री योजनेतून मागील तीन वर्षांत १७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकाने संगनमत करून बोगस जीएसटी बिले व PFMS नियमांचा चुराडा करत तब्बल १० लाखांवर थेट डल्ला मारल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे:
- लाखो लाटले, पण शौचालयांत पाणी नाही: कागदावर खर्च दाखवून प्रत्यक्षात शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून पाण्याचा थेंब नाही; चिमुकल्या विद्यार्थ्यांना थेट उघड्यावर शौचास बसावे लागत आहे.
- आर.ओ. बंद पाडून पाजले अशुद्ध पाणी: शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आर.ओ. मशीन जाणीवपूर्वक बंद ठेवून कोवळ्या जीवांच्या आरोग्याशी क्रूर खेळ खेळला जात आहे.
- जीवघेण्या वर्गखोल्या: निकृष्ट कामामुळे छताला भगदाड पडले असून लोंबकळणाऱ्या उघड्या विद्युत तारांमुळे वर्गात बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे.
- क्रीडा निधी हडप: खेळ साहित्याची खरेदी फक्त कागदावर दाखवून लाखो रुपयांचा निधी खिशात घालण्यात आला आहे.
भ्रष्टाचारावर बोट ठेवणाऱ्या प्रामाणिक शिक्षकाचा बळी घेण्याचा कट!
शाळेत सुरू असलेल्या या उघड लुटीविरोधात आवाज उठवणारे कर्तव्यदक्ष शिक्षक संजय आत्राम यांचा आवाज कायमचा दाबण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकाने एका पत्रकाराच्या संगनमताने अत्यंत गलिच्छ कट रचला. शाळेतील पोषण आहार महिला कर्मचाऱ्यांवर दबाव आणून, शिक्षक आत्राम व नवनिर्वाचित समिती सदस्यांवर थेट पोलीस अधीक्षकांकडे पूर्णपणे खोटी, बनावट व बिनबुडाची तक्रार दाखल करवून जाहीर बदनामी घडवून आणली. हा काळा कट उघडा पाडण्यासाठी शाळेचे त्या दिवसांचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तात्काळ जप्त करून सत्य समोर आणण्याची जोरदार मागणी होत आहे.
पुरावे दडपले, चार वेळा सभा उधळली; समितीची निवड दडपण्याचा डाव
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाहणी करून आर्थिक हिशोब व कागदपत्रे ५ दिवसांत सादर करण्याचे स्पष्ट लेखी आदेश दिले होते; परंतु चोरी पकडली जाईल या भयाने मुख्याध्यापकांनी दस्तऐवज जाणीवपूर्वक दडपून ठेवले. घोटाळा दडपण्यासाठी सलग चार वेळा पालक सभा उधळून लावण्यात आली. शेवटी २२ ऑगस्ट रोजी केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत कायदेशीर निवडणूक झाली असता, आता स्वतःचे काळे कारनामे लपवण्यासाठी जुन्या अध्यक्षांना हाताशी धरून ही अधिकृत निवडच रद्द करण्याचा खोडसाळ डाव रचला जात आहे.
उपोषणकर्त्यांचा प्रशासनाला थेट इशारा; मागण्या अशा:
१० लाखांचा शासकीय निधी हडपणाऱ्या आणि खोट्या तक्रारी रचणाऱ्या मुख्याध्यापक मुकुंदा परचाके व शिक्षक विलास ठोंबरे यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित (Suspend) करा! २. या संपूर्ण आर्थिक घोटाळ्यात आणि षड्यंत्रात सामील असणाऱ्या सर्व सूत्रधारांवर तात्काळ संगनमताचे फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोका! ३. मागील तीन वर्षांतील संपूर्ण १७ लाखांच्या खर्चाचे विशेष लेखापरीक्षण (Special Audit) व्हावे आणि शाळेचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ताब्यात घ्यावे! ४. २२ ऑगस्ट रोजी झालेली शाळा व्यवस्थापन समितीची कायदेशीर निवड त्वरित ग्राह्य धरून समितीला प्रत्यक्ष पदभार सोपवावा.
शिक्षक दिनीच मारेगाव पंचायत समितीसमोर सुरू झालेल्या या बेमुदत आमरण उपोषणादरम्यान कोणत्याही उपोषणकर्त्याच्या जिवाचे बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी निष्क्रिय, निर्ढावलेले प्रशासन आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर राहील, असा संतप्त इशारा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी दिला आहे.
0 Comments