युवा टायगर फोर्सच्या मागणीला मोठे यश; पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

युवा टायगर फोर्सच्या मागणीला मोठे यश; पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

३० जुलैच्या निवेदनाची आरोग्य विभागाकडून तातडीने दखल; डॉ. शेखर दोरखंडे यांची नियुक्ती, उर्वरित रिक्त पदे व सुविधांसाठी पाठपुरावा सुरूच






पांढरकवडा | वाजीद कुरेशी 

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आणत युवा टायगर फोर्सने केलेल्या मागणीला अखेर मोठे यश मिळाले आहे. ३० जुलै २०२६ रोजी आरोग्य उपसंचालक, अकोला यांच्याकडे करण्यात आलेल्या मागणीची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात MBBS, MD (Medicine) तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर दोरखंडे यांची नियुक्ती केली आहे.

पांढरकवडा व परिसरातील नागरिकांना उपचारासाठी यवतमाळ, नागपूर अथवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, तसेच शासकीय रुग्णालयातच दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी युवा टायगर फोर्सकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. विशेषतः संजय झोटिंग यांनी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती.

३० जुलैचे निवेदन ठरले निर्णायक

युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मदन जिद्देवार यांनी ३० जुलै रोजी आरोग्य उपसंचालक, अकोला डॉ. सुशील वाकचौरे यांची भेट घेऊन पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी आणि रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठोस मागणी केली होती.

यावेळी युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम, गणेश बोरकुटे, संजय आत्राम तसेच पत्रकार वाजिद कुरेशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या मागणीची दखल घेत आरोग्य विभागाने आता MD (Medicine) तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, संसर्गजन्य आजारांसह विविध वैद्यकीय समस्यांवर तज्ज्ञ सल्ला व उपचार मिळण्यास मदत होणार असून, परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

एक नियुक्ती झाली; आता उर्वरित प्रश्नांवर नजर

तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्याने युवा टायगर फोर्सने समाधान व्यक्त केले असले, तरी उपजिल्हा रुग्णालयातील इतर रिक्त पदे, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ आणि रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्याप कायम आहे.

“जनतेच्या आरोग्याचा प्रश्न हा कोणत्याही राजकारणापेक्षा मोठा आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती ही जनतेच्या मागणीला मिळालेली सकारात्मक पावती आहे. मात्र, रुग्णालयातील उर्वरित रिक्त पदे तातडीने भरून आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईपर्यंत युवा टायगर फोर्सचा पाठपुरावा थांबणार नाही,” अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेला बळ मिळाले असून, जनहितासाठी केलेल्या मागणीला मिळालेले हे यश नागरिकांसाठी दिलासादायक ठरले आहे.

Post a Comment

0 Comments