पहाटेच्या अंधारात रेती माफियांचे मनसुबे उधळले; कर्तव्यदक्ष तहसीलदार उत्तम निलावाड यांचा वर्धानदी पात्रात सर्जिकल स्ट्राईक!
कोसारा शिवारात महसूल पथकाची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई; दोन ट्रॅक्टर जप्त करत रेती तस्करांचे धाबे दणाणले
सचिन मेश्राम- मारेगाव
मारेगाव | : पहाटेचा दाट अंधार, नदीकाठची नीरव शांतता आणि याच संधीचा गैरफायदा घेत वर्धानदी पात्रात सुरू असलेला बेकायदेशीर रेती उपसा… मात्र, या बेकायदेशीर मनसुब्यांचा अचूक वेध घेत मारेगावच्या महसूल पथकाने पहाटेच्या सुमारास असा काही ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला की रेती तस्करांची अक्षरशः पळता भुई थोडी झाली. कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री. उत्तम निलावाड यांच्या थेट आणि धडक नेतृत्वाखाली कोसारा शिवारात छापा टाकून अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर रंगेहात जप्त करण्यात आले.
अंधारात रचला सापळा, ‘ऑन द स्पॉट’ दणका! दिनांक २८ ऑगस्ट रोजी भल्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोसारा (ता. मारेगाव) शिवारातील वर्धानदी पात्रात अवैध रेती उपशाचा गोरखधंदा सुरू असल्याची पक्की माहिती महसूल विभागाला मिळाली. तहसीलदार श्री. उत्तम निलावाड यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने कारवाईचे चक्र फिरवले. पथकाने घटनास्थळी धडक मारताच रेती माफियांची मोठी धावपळ उडाली. ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्याचे काम चालू असतानाच महसूल पथकाने दोन्ही ट्रॅक्टर जागीच ताब्यात घेऊन मारेगाव तहसील कार्यालयात जमा केले.
सक्षम नेतृत्व आणि नियोजनबद्ध मोहीम परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी श्री. यतीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई पूर्णत्वास गेली. तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या धडक आणि बिनधास्त कार्यशैलीमुळे मारेगाव तालुक्यात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत तलाठी सनदेवल कुडमेथे, मनोज चिकनकर आणि शिपाई किसन वेले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नियमबाह्य कृत्यांना थारा नाही! जप्त करण्यात आलेल्या दोन्ही वाहनांवर महसूल कायद्यानुसार कडक दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
"शासकीय महसूल बुडवून नदी पात्राचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घातले जाणार नाही. अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील," असा सज्जड इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.
तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या या तत्पर आणि बेधडक भूमिकेचे मारेगाव तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांमधून जोरदार कौतुक होत आहे.
0 Comments