महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारिणीत वर्धा जिल्ह्याचा उत्कृष्ट अहवाल सादर; रजनी सुरकार यांनी मांडला लेखाजोखा
वर्धा (अर्पित वाहाणे, वर्धा): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची (अंनिस) तीन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच अहिल्यानगर येथील ‘बडी साजन मंगल कार्यालय’ येथे पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्र अंनिस, जिल्हा वर्धा शाखेच्या वतीने 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिके'च्या जिल्हा कार्यवाह रजनी गजेंद्र सुरकार यांनी जानेवारी ते ५ जून या कालावधीतील जिल्ह्याचा सविस्तर अहवाल राज्य कार्यकारिणीसमोर मांडला. वर्धा शाखेने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल यावेळी राज्य पातळीवर घेण्यात आली.
दिग्गज पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
हा अहवाल सादर करताना मंचावर राज्य कार्याध्यक्ष प्रा. संजय बनसोडे (सांगली), राज्य अध्यक्ष मा. माधव बावगे (लातूर), राज्य प्रधान सचिव विनायक सावळे (शहादा), डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक), गजेंद्र सुरकार (वर्धा), व्यसन व संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह सारिका डेहनकर (वर्धा), वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे (वर्धा), वर्धा शहर शाखा प्रधान सचिव कल्पना सातव-फुसाटे आणि उपाध्यक्ष अशोक हेडावू प्रामुख्याने उपस्थित होते.
विविध उपक्रमांचा वेध
अहवाल सादर करताना रजनी सुरकार यांनी वर्धा शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण भागांत राबविण्यात आलेल्या प्रबोधनपर कार्यक्रमांची माहिती दिली. यासोबतच जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, सेलू, देवळी आणि समुद्रपूर या शाखांद्वारे राबविण्यात आलेले विविध उपक्रम, 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिके'ची सभासद नोंदणी, नवीन सदस्य नोंदणी, नियमित शहर शाखा बैठका आणि जमा करण्यात आलेल्या देणग्या व जाहिराती या सर्व बाबींचा सविस्तर लेखाजोखा त्यांनी मांडला. तसेच आगामी चार महिन्यांत जिल्ह्यात कोणकोणते नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविले जाणार आहेत, याचेही नियोजन त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
३६ जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची उपस्थिती
तीन दिवस चाललेल्या या राज्य कार्यकारिणी बैठकीला महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून तब्बल २९३ प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या अफाट उपस्थितीत वर्धा जिल्हा शाखेने केलेल्या संघटित आणि रचनात्मक कार्याचे राज्यभरातून कौतुक करण्यात आले.
0 Comments