​बाभूळगावात आगीचे 'तांडव': ५० घरे खाक

​बाभूळगावात आगीचे 'तांडव': ५० घरे खाक; अनेक नागरिक गंभीर जखमी, तर पशुधन आगीत भस्मसात!
​सिलिंडर स्फोटांमुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याने ग्रामस्थांचा संसाराचा चुराडा; मदतीसाठी प्रशासनाकडे आर्त हाक

​भिसी/चिमूर (प्रतिनिधी): तालुक्यातील बाभूळगाव (भिसी) येथे काल रात्री निसर्गाचा कोप आणि भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतातील आग गावात शिरली आणि काही क्षणातच ५० हून अधिक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले. यात अनेक नागरिक गंभीररीत्या भाजले असून, गोठ्यात बांधलेली मुकी जनावरे जागीच होरपळून मृत्युमुखी पडली आहेत.



​सिलिंडर स्फोटांनी वाढली आगीची तीव्रता
​मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील आग वाऱ्यामुळे घरांच्या दिशेने आली. घरांनी पेट घेताच घरातील गॅस सिलिंडरचे एकामागून एक स्फोट होऊ लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. वाऱ्यामुळे धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण गावाला वेढले होते. जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांची मोठी धावपळ झाली, मात्र वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे अनेकांना घराबाहेर पडता न आल्याने ते आगीत गंभीर जखमी झाले आहेत.
​पशुधनाचा करुण अंत! बळीराजाचा खरा आधार असलेली मुकी जनावरे गोठ्यातच बांधलेली होती. वाऱ्यामुळे आग इतक्या वेगाने पसरली की जनावरांना सोडण्याची संधीही मिळाली नाही. अनेक गायी, बैल आणि वासरांचा आगीत जळून करुण अंत झाला. सकाळच्या सुमारास जळालेले गोठे आणि मृतावस्थेतील जनावरे पाहून ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते.
​अग्निशमन दलाचे प्रयत्न तोकडे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, एका बाजूला सोसाट्याचा वारा आणि दुसऱ्या बाजूला सिलिंडरचे होणारे स्फोट यामुळे या दोन गाड्यांनाही आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. अखेर ग्रामस्थांच्या मदतीने तासनतास सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर आगीवर ताबा मिळवण्यात आला, मात्र तोपर्यंत ५० हून अधिक कुटुंबांच्या स्वप्नांचा राखरांगोळी झाला होता.
​मदतीसाठी धावून येण्याचे आवाहन बाभूळगावच्या या पीडित कुटुंबांकडे आता अंगावरील कपड्यांशिवाय काहीही उरलेले नाही. धान्य, कपडे, पैसा-अडका सर्व काही आगीत भस्मसात झाले आहे. अशा कठीण प्रसंगी सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आणि प्रशासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून पीडितांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी संपूर्ण चिमूर तालुक्यातून होत आहे.

Post a Comment

0 Comments