पुतळा हटवायला वाघासारखे धावणारे पोलीस अन् स्थानिक प्रशासन, बसवताना नेमके कुठे शेपूट घालून बसले होते?

पुतळा हटवायला वाघासारखे धावणारे पोलीस अन् स्थानिक प्रशासन, बसवताना नेमके कुठे शेपूट घालून बसले होते? शिवप्रेमींचे मन दुखावणारे अधिकारी आता जनतेच्या रडारवर!
​मारेगाव (विशेष प्रतिनिधी):

मारेगावच्या इतिहासात पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा कळस गाठणारी घटना मार्डी चौकात घडली आहे. ज्या पोलीस ठाण्यावर आणि नगरपंचायतीवर शहराच्या सुरक्षेची व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांच्यापासून हाकेच्या अंतरावर मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापित झाला आणि प्रशासनाला त्याची गंधवार्ताही नसावी, ही बाब संशयास्पद आणि संतापजनक आहे. या घटनेमुळे मारेगाव पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ठाणेदार शाम वानखेडे आणि बीट जमादार शंकर बारेकर यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
​खाकीसह स्थानिक प्रशासनाची इभ्रत चव्हाट्यावर; 'यंत्रणा' फेल?
​मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या गेटवरच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, स्टेशन डायरीवर ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी आहेत. तरीही १०० मीटरवर चाललेली ही मोठी हालचाल कोणाच्याच नजरेस पडली नाही का? रात्रभर गस्तीचा आव आणणारे पोलीस पथक, सीसीटीव्हीकडे डोळे लावून बसणारे कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाचे बेजबाबदार अधिकारी नेमकं काय करत होते? असे जळजळीत प्रश्न आता मारेगावचा सामान्य नागरिक विचारत आहे. "काल रात्रीच्या सुमारास जर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने योग्य दखल घेतली असती, तर आज ही वेळ आलीच नसती," असा सूर आता उमटत आहे. "रात्री पुतळा बसवताना आंधळे झालेले पोलीस आणि स्थानिक प्रशासन, सकाळी मात्र तो हटवण्यासाठी अचानक 'कार्यक्षम' कसे झाले?" हा सवाल उपस्थित करून शिवप्रेमींनी प्रशासनाचा दुटप्पीपणा आणि अकार्यक्षमता उघड केली आहे.
​प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुखावले शिवप्रेमींचे मन!
​पुतळा हटवताना पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने ज्या प्रकारचा 'अविचारी' उत्साह दाखवला, त्यामुळे हजारो शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवप्रेमींनी पुतळा सन्मानाने एक दिवस ठेवण्याची कळकळीची विनंती केली होती, मात्र ठाणेदार शाम वानखेडे, बीट जमादार शंकर बारेकर आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणताही भावनिक विचार न करता, लोकभावनेचा आदर न करता दडपशाहीने पुतळा हटवण्याचा पवित्रा घेतला. प्रशासनाने अखेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवून तो नगरपंचायतीच्या स्वाधीन केला आहे. ज्या हातांनी रात्रभर दुर्लक्ष केले, त्याच हातांनी सकाळी महाराजांच्या पुतळ्याला हटवण्याची घाई केली, यामुळे शिवप्रेमींच्या मनात प्रशासनाबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
​मारेगावमध्ये संतापाची लाट; निलंबनाची मागणी लावून धरली
​या संपूर्ण गोंधळाला आणि तणावाच्या परिस्थितीला पोलीस निरीक्षक शाम वानखेडे आणि बीट जमादार शंकर बारेकर यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे बेजबाबदार अधिकारी हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि संवेदनशील विषयात अदूरदर्शीपणा दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच ही घटना घडली, असे म्हणत दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
​शहरात कडकडीत बंद; प्रशासनाच्या निषेधार्थ नारेबाजी
​पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या या अजब आणि संतापजनक कारभाराच्या निषेधार्थ आज मारेगावच्या जनतेने स्वतःहून दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. मार्डी चौकात जमा झालेल्या शिवप्रेमींनी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाविरोधात जोरदार नारेबाजी केली. "महाराजांचा सन्मान करू शकत नसाल, तर अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?" असा जाब विचारत जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments