जेंगेवार यांचे चोर सापडले, मग घागींचे सोने कुठे? मारेगाव पोलिसांचा गुन्हेगारांसमोर 'लोटांगण'!
मारेगाव (सचिन मेश्राम):
मारेगाव शहरात सध्या कायद्याचे राज्य नसून 'चोरांचे आणि तंबाखू माफियांचे' नंदनवन सुरू आहे. यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडाकेबाज कारवाई करत सुशील जेंगेवार यांच्या घरफोडीचा तपास लावला खरा, मात्र मारेगाव पोलिसांच्या नाकाखाली झालेल्या गजानन घागी यांच्या चोरीचा पत्ता अजूनही लागलेला नाही. ठाणेदार श्याम वानखेडे आणि बिट जमादार शंकर बारेकर यांच्या सुस्त कारभारामुळे घागी यांच्या कष्टाचे १४ तोळे सोने अजूनही चोरांच्याच ताब्यात असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे धिंडवडे निघाले आहेत.
एलसीबीने 'इज्जत' वाचवली, पण घागींचे सोने कुठे?
एलसीबीच्या पथकाने वणी-पांढरकवडा विभागात सापळा रचून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सुशील जेंगेवार यांच्या चोरीचा (गुन्हा क्र. १४२/२०२६) पूर्ण तपास लागला. मात्र, मारेगाव पोलिसांना हा साधा सुगावाही लागला नव्हता. विशेष म्हणजे, गजानन घागी यांच्या दुकानातून लंपास झालेले लाख ७९ हजार रुपयांचे सोने आणि रोख रक्कम शोधण्यात स्थानिक पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. जे काम एलसीबीने एका तपासात करून दाखवले, ते मारेगावच्या बिट जमादारांना का जमेना? असा संतप्त सवाल घागी कुटुंबासह नागरिक विचारत आहेत.
'मजा १०८' चा महापूर; खाकीतील 'जयसूर्या' आणि 'स्टेडियम मास्टर'चा उच्छाद!
शहरात चोऱ्यांचा तपास लागत नसताना, मारेगाव पोलीस ठाण्यातील काही 'वसुली बहाद्दर' खाकीच्या आडोशाने सुगंधित तंबाखूच्या अवैध धंद्यातून खिसे भरण्यात मश्गूल आहेत. एका 'सनत जयसूर्या' आणि **'वानखेडे स्टेडियम'**चा प्रमुख म्हणवून घेणाऱ्या जोडगोळीच्या वरदहस्तामुळेच तालुक्यात 'मजा १०८' आणि बंदी असलेल्या गुटख्याचा महापूर आला आहे. तस्कर जावेद आणि त्याचे हस्तक 'महिंद्रा बोलेरो' गाड्यांमधून घराघरांत अवैध साठे पोहोचवत आहेत. या तंबाखू माफियांच्या मलिद्यामुळेच पोलिसांचा चोरांवरील धाक संपला आहे का?
३. प्रशासकीय लकवा: गस्तीचा फज्जा अन् हप्तेखोरीची 'मजा'!
बिट जमादार शंकर बारेकर यांच्या कार्यक्षेत्रात सलग चोऱ्या होत असताना, पोलिसांची गस्त नेमकी कुठे असते? रात्रीच्या वेळी पोलीस पेट्रोलिंग करण्याऐवजी नेमके कुठे 'विश्राम' करतात, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे. चोरांवर वचक बसवण्यासाठी जो नैतिक दरारा लागतो, तो 'हप्तेखोरी'मुळे पूर्णपणे संपला आहे. पोलिसांच्या या हतबलतेमुळेच चोरटे आता भरवस्तीत घरफोड्या करण्याचे धाडस करत आहेत.
४. सविस्तर विश्लेषण: 'अर्थपूर्ण' शांतता अन् सामान्य जनतेची सजा!
मारेगाव पोलीस ठाण्याचे रूपांतर आता जनसेवा केंद्राऐजी 'वसुली केंद्रात' झाले आहे. घागींसारख्या सामान्य नागरिकाच्या कष्टाची कमाई चोरीला जाते, तेव्हा पोलीस 'तपास सुरू आहे' असे सांगून वेळ मारून नेतात. एलसीबीने जेंगेवार यांच्या चोरीचा तपास लावणे ही मारेगाव पोलिसांची 'नैतिक हार' आहे. ठाणेदारांनी केवळ खुर्ची उबवण्याऐजी आपल्या 'सुस्त' कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर कदाचित आज घागींचे सोने सुरक्षित राहिले असते.
एस.पी. साहेब, आता मारेगावची 'विकेट' घ्या!
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नेर-डूमनापूरप्रमाणे मारेगावमधील या 'स्टेडियम मास्टर्स' आणि खाकीतील गद्दारांची कुंडली तपासावी. जोपर्यंत हे वसुली बहाद्दर ठाण्यात ठाण मांडून बसतील, तोपर्यंत मारेगावात चोऱ्यांचा सुळसुळाट थांबणार नाही. घागींच्या चोरीचा तपास लावून चोरांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक शासन व्हावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
0 Comments