मारेगाव तालुक्यातील लाखापुरात कुत्र्यावरून राडा; एकाच्या डोक्यात घातला दगड

मारेगाव तालुक्यातील लाखापुरात कुत्र्यावरून राडा; एकाच्या डोक्यात घातला दगड


मारेगाव : सचिन मेश्राम 

तालुक्यातील लाखापूर येथे कुत्र्याला मारल्याच्या शुल्लक कारणावरून दोन गटात वाद होऊन एका मजुराच्या डोक्यात दगडाने प्रहार करण्यात आला. या घटनेत अर्जुन हारोड हे गंभीर जखमी झाले असून, मारेगाव पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कुत्र्याने कोंबडीचे पिल्लू खाल्ल्याने झाला वाद

मिळालेल्या माहितीनुसार, लाखापूर येथील रहिवासी अर्जुन गोपाल हारोड (वय ४०) यांच्या कोंबडीचे पिल्लू गावातील एका कुत्र्याने खाल्ले. यामुळे संतप्त झालेल्या अर्जुन यांनी कुत्र्याला काठीने मारण्यासाठी पाठलाग केला. तो कुत्रा शेजारी राहणारे दीपक वामन छापेकर यांच्या घराच्या मागे जाऊन लपला.

​यावेळी आरोपी दीपक छापेकर याने "तू कुत्र्याला का मारत आहेस?" असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केली. अर्जुन यांनी कुत्र्याने पिल्लू खाल्ल्याचे सांगितले असता, आरोपीने वादावादी करून त्यांना धक्कामुक्की केली आणि हातातील दगडाने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्यातून रक्त निघून ते जखमी झाले. याच दरम्यान आरोपी सौ. रूपा वामन छापेकर हिनेदेखील वाद घालून काठीने अर्जुन यांच्या पायावर मारहाण केली.

दोन जणांवर गुन्हा दाखल

घटनेच्या वेळी गावातून येण्या-जाण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने जखमी अर्जुन हारोड यांनी २९ एप्रिल रोजी दुपारी मारेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी दीपक वामन छापेकर (३५) आणि सौ. रूपा वामन छापेकर (५०) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार दिगंबर किनाके करीत आहेत.

Post a Comment

0 Comments