मारेगावात प्रशासकीय मुजोरीचा कळस; शिवरायांच्या पुतळ्यावरून ५२ शिवप्रेमींवर गुन्हे?सभापती गौरीशंकर खुराणांचे प्रशासनाला थेट आव्हान!
मारेगाव (प्रतिनिधी):
ज्या शहराने नेहमीच सर्व जाती-धर्माच्या लोकांना प्रेमाने सामावून घेतले, त्या मारेगावच्या सामाजिक सलोख्याला प्रशासकीय अदूरदर्शीपणामुळे गालबोट लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नसून, ते संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आणि 'आदर्श' राज्यकर्ते आहेत. शिवरायांनी स्वराज्यात नेहमीच न्याय आणि नीतिमत्तेचा आदर्श घालून दिला. मात्र, दुर्दैवाने मारेगाव प्रशासनाने पुतळा बसवताना गाफील राहून आणि तो हटवताना दडपशाही दाखवून या आदर्शांची पायमल्ली केली आहे. स्वतःचे 'इंटेलिजन्स' अपयश झाकण्यासाठी ५२ निरपराध शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
गौरीशंकर खुराणांचे प्रशासनाला थेट आव्हान: "स्वतःचे नाकर्तेपण लपवण्यासाठी शिवप्रेमींचा बळी देऊ नका!"
या प्रकरणावर संताप व्यक्त करताना मारेगाव बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांनी प्रशासनाला उघडे पाडले आहे. त्यांनी ठणकावून सांगितले की, "पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर पुतळा बसवला जातो आणि प्रशासनाला खबर लागत नाही, हे यंत्रणेचे दिवाळखोरपण आहे. जर विनापरवाना पुतळा बसवणे हा गुन्हा असेल, तर तो बसत असताना 'कुंभकर्णी' झोप घेणारे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा हे पहिले गुन्हेगार आहेत. प्रशासनाने तातडीने ५२ निरपराध तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल."
प्रशासनाकडून 'आदर्श' मूल्यांना हरताळ; पुतळा हटवताना नियमांची पायमल्ली!
छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच प्रजेच्या भावनांचा आदर केला, पण मारेगाव प्रशासनाने लोकभावनेचा विचार न करता अघोरी मार्गाने पुतळा हटवला. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पुतळा हटवताना विशिष्ट कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे, स्थानिक शांतता समितीला विश्वासात घेणे आणि सन्मान राखणे बंधनकारक होते. मात्र, प्रशासनाने संविधानाच्या चौकटीत राहून संवाद साधण्याऐवजी दमनतंत्राचा वापर केला, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.
"दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाहीत!"
"छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवप्रेमींवरच अन्याय होणे, हा लोकशाहीचा अपमान आहे," अशा शब्दांत खुराणा यांनी आपला रोष व्यक्त केला. ज्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे शहरात तणाव निर्माण झाला, त्या ठाणेदारासह संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा इशारा जनहित कल्याण संघटनेने दिला आहे. हा लढा आता केवळ एका पुतळ्यापुरता मर्यादित नसून तो प्रशासकीय अरेरावीच्या विरोधात स्वाभिमानाचा लढा बनला आहे.
मारेगावकरांना साद: "संयम राखा, सनदशीर मार्गाने न्याय मिळवू!"
मारेगावची ओळख 'सर्वधर्मसमभावाचे' प्रतीक अशी आहे. प्रशासनाच्या वैफल्यग्रस्त कारवाईमुळे आपला सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी खुराणा यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. "आपण कायद्याचे आणि संविधानाचे पालन करूया, पण अन्यायासमोर झुकणार नाही. ५२ जणांवर झालेले गुन्हे हा प्रशासनाचा मानसिक पराभव आहे. आपण न्यायालयीन मार्गाने या तरुणांना न्याय मिळवून देऊ, कुणीही अफवांना बळी पडू नका," असे आवाहन त्यांनी केले आहे.
0 Comments