मारेगाव तालुक्यात आगीचे तांडव; गोरज येथील शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान


मारेगाव तालुक्यात आगीचे तांडव; गोरज येथील शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान

धान्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक; पंचनामा करून मदतीची मागणी



मारेगाव : सचिन मेश्राम 

तालुक्यातील मौजा गोरज येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत सुमारे २ लाख रुपयांचे शेती साहित्य आणि साठवलेले धान्य जळून खाक झाले असून, शेतकरी शंकर बापुराव पारोधी यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शंकर पारोधी यांचे मौजा गोरज शिवारातील गट क्रमांक २४ मध्ये शेत आहे. या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे गोठ्यात साठवून ठेवलेले ९ क्विंटल तूर, ६ क्विंटल चणा, ४ क्विंटल गहू, १ क्विंटल धना तसेच घरगुती वापरासाठीची तूर आणि चणा डाळीची पोती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

साहित्याचेही मोठे नुकसान

केवळ धान्यच नव्हे, तर गोठ्यातील जनावरांचा चारा, शेती संरक्षणासाठी लावलेली झटका मशीन आणि विविध महत्त्वाची शेती अवजारे सुद्धा या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आगीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला असला, तरी पारोधी यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मदतीची प्रतीक्षा

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, ऐन हंगामाच्या तोंडावर वर्षभराची पुंजी जळाल्याने पारोधी कुटुंब हतबल झाले आहे. संबंधित महसूल विभागाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गोरज येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments