वणीतील लेखकाचा पंढरीत गौरव; संत काशीबा गुरवांवरील संशोधनाची 'संतभूमी'त दखल

वणीतील लेखकाचा पंढरीत गौरव; संत काशीबा गुरवांवरील संशोधनाची 'संतभूमी'त दखल


मारेगाव/वणी (प्रतिनिधी):

संत आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक सुनील इंदुवामन ठाकरे यांच्या लेखणीची दखल आता साक्षात पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी घेण्यात आली आहे. संत काशीबा गुरव महाराजांवरील संशोधन व लेखनासाठी पंढरपूर जवळील गोपाळपूर येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

'जनाबाईंच्या संसारा'त सन्मान

संत जनाबाईंचा संसार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील मंदिरातच संत काशीबा गुरव महाराजांची समाधी आहे. सुनील ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून या संतांच्या जीवनावर संशोधन करण्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान गोपाळपूर संस्थानाचे अध्यक्ष दिलीपभाऊ भोसले आणि ह.भ.प. माउली महाराज गुरव यांच्या हस्ते ठाकरेंचा गौरव करण्यात आला.

'रिंगण' विशेषांकासाठी संशोधन

संत काशीबा महाराजांनी समकालीन संत सावता महाराजांचे अभंग लिहून काढले होते. त्यांच्या जीवनावरील नव्या माहितीचे संशोधन करण्याची महत्त्वाची जबाबदारी 'रिंगण'चे संपादक सचिन परब यांनी सुनील ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. या संशोधनावर आधारित लेख 'रिंगण'च्या आगामी आषाढी विशेषांकात प्रसिद्ध होणार आहे.

आषाढी एकादशीला होणार प्रकाशन

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 'रिंगण' विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या समकालीन १३ संतांवर (ज्यात संत कुर्मदास, जगमित्र नागा, जोगा परमानंद, कान्हो पाठक आणि काशीबा गुरव यांचा समावेश आहे) प्रकाश टाकणारा हा अंक वारकरी संप्रदायात महत्त्वाचा मानला जातो. या महत्त्वपूर्ण प्रकल्पात वणीतील लेखकाचे योगदान असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Post a Comment

0 Comments