शेतकऱ्यांच्या आक्रोशापुढे जिल्हा मध्यवर्ती बँक झुकली! मारोती गौरकार यांच्या आंदोलनाचा दणका; अखेर पीक कर्ज वाटप सुरू!
नरेंद्र ठाकरे आणि गौरीशंकर खुराणा यांच्या नेतृत्वाला मोठे यश; उपोषणाचा इशारा मिळताच प्रशासनाची पळापळ
मारेगाव: सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी पीक कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अखेर जनशक्तीपुढे झुकावे लागले आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा आदि. वि. कार्य. सह. संस्था पिसगावचे संचालक श्री. मारोती माधव गौरकार यांनी दिलेल्या उपोषणाच्या निर्वाणीच्या इशाऱ्याची बँक प्रशासनाने प्रचंड धास्ती घेतली.
जिल्हा व्यवस्थापकांनी तातडीने दखल घेत, “कृपया उपोषणाला बसू नका, आम्ही तात्काळ कर्ज वाटप सुरू करतो,” अशी विनवणी करत अखेर मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास सुरुवात केली आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नरेंद्र पाटील ठाकरे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली दिलेल्या या लढ्याला ऐतिहासिक यश आले आहे. निवेदन देतेवेळी मारोती गौरकार यांच्यासोबत प्रमुख कार्यकर्ते तुळशीराम कुमरे प्रामुख्याने उपस्थित होते.
काय होते प्रकरण? बँक अधिकाऱ्यांची मनमानी नडली!
मारेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वीच आपल्या जुन्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केली होती. नियम पाळणाऱ्या या प्रामाणिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर तातडीने नवीन पीक कर्ज मिळणे अपेक्षित होते.
मात्र, मारेगाव शाखेचे अधिकारी आणि बँक निरीक्षक जाणीवपूर्वक टाळाटाळ करत संस्थांचे तक्ते तपासण्यात वेळ काढूपणा करत होते. बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची दमडीही उरली नव्हती. आधीच नापिकी आणि शेतमालाला भाव नसल्याने होरपळलेल्या शेतकऱ्यांची बँकेकडून होणारी ही उघड अडवणूक आणि उद्धट वर्तणूक आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली होती.
२ दिवसांचा अल्टिमेटम आणि बँक प्रशासनाची पाचावर धारण!
शेतकऱ्यांची ही दैना पाहून मारोती गौरकार यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १२ मे २०२६ रोजी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक आणि मारेगाव व्यवस्थापकांना थेट लेखी निवेदन सादर केले.
"येत्या २ दिवसांत पीक कर्ज वाटप सुरू करा, अन्यथा नाइलाजास्तव बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल," असा थेट आणि आक्रमक इशारा या निवेदनातून देण्यात आला होता.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार आणि सहकार अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या होत्या. गौरकार आणि तुळशीराम कुमरे यांच्या उपस्थितीत दिलेल्या या पवित्र्यामुळे बँक वर्तुळात एकच खळबळ उडाली आणि उपोषणाची वेळ येण्यापूर्वीच प्रशासनाने नमते घेत कर्ज वाटपाचे आदेश काढले.
नरेंद्र ठाकरे आणि गौरीशंकर खुराणा यांच्या मार्गदर्शनाची ताकद!
मारेगाव हा आदिवासीबहुल आणि दुर्दैवाने आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. अशा संवेदनशील भागात शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या यंत्रणेचे दात घशात घालण्याचे काम या आंदोलनाने केले आहे. माजी जि.प. उपाध्यक्ष नरेंद्र पाटील ठाकरे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या योग्य दिशादर्शन आणि नेतृत्वामुळेच हा लढा अल्पावधीत यशस्वी झाला, अशी भावना आता मारेगाव तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण:
मारोती गौरकार यांनी वेळेवर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि दिलेल्या दणक्यामुळे आज मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातात हक्काचे पीक कर्ज पडू लागले आहे. शेतकऱ्यांची लूट आणि अडवणूक करणाऱ्यांना लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची एकजूट काय धडा शिकवू शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे!
0 Comments