मारेगावात ‘चोरबीटी’चा उच्छाद; बळीराजाच्या जीवावर कृषी विभागाचा ‘मलिदा’!​

मारेगावात ‘चोरबीटी’चा उच्छाद; बळीराजाच्या जीवावर कृषी विभागाचा ‘मलिदा’!

मनसे आक्रमक; तस्करांशी संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चा इशारा



आनंद नक्षणे- मारेगाव

मारेगाव :भ्रष्ट अधिकारी आणि बियाणे तस्करांच्या अभद्र युतीने मारेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या मृत्यूचा सापळा रचला आहे. महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे प्रतिबंधित असलेल्या HTBT (चोरबीटी) कापूस बियाण्यांची विक्री ही आता 'चोरीछुपे' राहिली नसून, ती कृषी विभागाच्या उघड पाठिंब्याने सुरू असलेला 'महाघोटाळा' बनली आहे. "शेतकऱ्यांच्या चितेवर आपली पोळी भाजणाऱ्या" या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रणशिंग फुंकले आहे.

प्रशासनाची 'कुंभकर्णी झोप' की 'हप्तेखोरी'?

​तालुक्यातील चिंचाळा, आकापूर, नवरगाव, बोटोणी, कुंभा यांसह डझनभर गावांमध्ये तस्कर दिवसाढवळ्या प्रतिबंधित बियाणे विकत आहेत. मनसेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, "सामान्य जनतेला आणि राजकीय कार्यकर्त्यांना जे तस्कर उघड्या डोळ्यांनी दिसतात, ते एसी केबिनमध्ये बसून 'चिरीमिरी' लाटणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांना का दिसत नाहीत? हा प्रकार म्हणजे कृषी विभागाने तस्करांशी केलेली 'पार्टनरशिप' आहे!"

'चोरबीटी' म्हणजे शेतीसाठी स्लो पॉयझन!

​या अवैध बियाण्यांमुळे जमिनीचा पोत कायमचा नापीक होत असून, शेतकरी कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटला जात आहे. तालुक्यात वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत असणाऱ्या या 'विषारी' साखळीला स्थानिक कृषी अधिकाऱ्यांची मूक संमती असल्याचा थेट आरोप मनसेने केला आहे. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा आणि आयुष्याची धूळधाण करणाऱ्या या रॅकेटचा मास्टरमाइंड कोण? असा जळजळीत सवाल आता विचारला जात आहे.

पुराव्यांचा पाऊस; प्रशासनाचे धाबे दणाणले

​संतोष रोगे यांनी केवळ तक्रार केली नसून, तस्करांच्या पाकिटांचे फोटो आणि ठोस पुरावे जिल्हा प्रशासनाच्या तोंडावर फेकले आहेत. "पुराव्यासह तक्रार देऊनही जर कारवाई होत नसेल, तर मारेगाव कृषी कार्यालयाला तस्करांचा अड्डा घोषित करावे," अशी विखारी टीका आता होत आहे.

संतोष रोगे यांचा 'थेट' हल्लाबोल

​"मारेगावचा कृषी विभाग हा केवळ नावापुरता उरला असून, प्रत्यक्षात तो बियाणे तस्करांचा 'पे रोल'वर असलेला भागीदार बनला आहे. शेतकरी आत्महत्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच बळीराजा पुन्हा एकदा मृत्यूच्या खाईत लोटला जात आहे. जर प्रशासनाला पुरावे दिसत नसतील, तर आम्ही त्यांच्या डोळ्यांवरील मलिद्याची पट्टी खेचून काढू. २४ तासांत तस्करांच्या मुसक्या आवळल्या नाहीत आणि दोषी कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले नाही, तर मनसे स्टाईलने 'खळ्ळ-खट्याक' अटळ आहे!"


अंतिम इशारा: कारवाई करा अन्यथा खुर्च्या सोडा!

​कृषी विभागाने जर तात्काळ धाडसत्र राबवून तस्करांच्या मुसक्या आवळल्या नाहीत आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या एकाही अधिकाऱ्याला तालुक्यात फिरू देणार नाही, असा जहाल इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments