मारेगाव भूमी अभिलेख कार्यालय की 'भ्रष्टाचाराचा' अड्डा? ८० वर्षीय वृद्धेच्या उपोषणाने कारभार चव्हाट्यावर!
मुरलीधर जाधवांच्या संशयास्पद कार्यपद्धतीमुळे वयोवृद्ध महिला भर उन्हात जीवन-मरणाच्या दारात
मारेगाव: सचिन मेश्राम
एकीकडे सरकार 'सलोखा योजना' आणि 'शेतकऱ्यांच्या दारात प्रशासन' अशा घोषणा हवेत सोडत असताना, दुसरीकडे मारेगावच्या भूमी अभिलेख कार्यालयात मात्र एका ८० वर्षीय वृद्ध माउलीला आपल्या हक्काच्या जमिनीसाठी भर उन्हात जीव पणाला लावावा लागत आहे. न्यायालयाचे स्पष्ट आदेश खिशात घेऊन फिरणाऱ्या कमल दादाजी पेंदोर (वय ८० वर्ष) या वृद्धेला अखेर शासकीय अनास्थेविरोधात बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे. विदर्भातील तापमान सध्या ४२ अंश सेल्सिअस वर पोहोचले असून, आज उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला तरी भूमी अभिलेख प्रशासन मात्र 'ढिम्म' बसल्याचे चित्र आहे.
न्यायालयाचा आदेशही कचऱ्याच्या टोपलीत?
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा बोटोणी येथील सर्व्हे क्र. ७ मधील २.३२ हेक्टर जमिनीवर कमल पेंदोर यांची ७/१२ आणि फेरफारनुसार अधिकृत नोंद आहे. या प्रकरणात न्यायालयाने देखील त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागाने या जमिनीची मोजणी करून तातडीने सीमांकन (हद्द निश्चित) करून देणे गरजेचे होते. मात्र, भूमी अभिलेख उपअधीक्षक मुरलीधर जाधव आणि त्यांच्या कार्यालयाने या वृद्धेला केवळ तारखांवर तारखा देत कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावले. न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवणाऱ्या या 'वेळकाढू' कारभाराविरोधात आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासकीय छळ: ८० वर्षांच्या माउलीला थेट उन्हात बसवले!
अनेक महिने चकरा मारून थकल्यानंतर, कमल पेंदोर यांनी ७ मे २०२६ रोजी प्रशासनाला लेखी इशारा दिला होता की, १४ मे पर्यंत न्याय न मिळाल्यास १५ मे पासून उपोषणाला बसेल. मात्र, वातानुकूलित केबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना या इशाऱ्याचे काहीच सोयरसुतक वाटले नाही. परिणामी, काल १५ मे २०२६ पासून या ८० वर्षांच्या वृद्धेला भर उन्हात, उघड्या मंडपात उपोषणाला बसावे लागले आहे.
४२ अंश तापमान... अन् अधिकाऱ्यांची क्रूर शांतता!
सध्या मारेगावात सूर्य आग ओकत असून पारा ४२ अंशांच्या पार गेला आहे. या जीवघेण्या उन्हात तरुण माणसाचाही जीव कासावीस व्हावा, अशा स्थितीत एक ८० वर्षांची म्हातारी न्यायासाठी प्रशासनाच्या दारात बसली आहे. "माझे वय ८० च्या वर आहे, मी आणखी किती दिवस चकरा मारू? मला न्याय द्या किंवा माझा जीव घ्या," अशी आर्त हाक पेंदोर यांनी दिली आहे. जर या उन्हात वृद्धेच्या तब्येतीला काही बरे-वाईट झाले, तर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा भूमी अभिलेख विभागावर दाखल करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मारेगाव भूमी अभिलेख कार्यालय की 'भ्रष्टाचाराचा' अड्डा?
या उपोषणामुळे मारेगाव भूमी अभिलेख कार्यालयाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. अनेक सामान्य नागरिकांनी आरोप केला आहे की, या कार्यालयात सामान्य शेतकऱ्यांची कामे वेळेवर केली जात नाहीत. केवळ आर्थिक देवाणघेवाण किंवा राजकीय वशिल्याची वाट पाहत गरिबांना ताटकळत ठेवले जाते. उपअधीक्षक मुरलीधर जाधव यांच्या या संशयास्पद आणि वेळकाढू धोरणामुळे संपूर्ण तालुक्यातून प्रशासनाचा तीव्र निषेध केला जात आहे.
आता या प्रकरणात वरिष्ठ जिल्हाधिकारी आणि भूमी अभिलेखचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ हस्तक्षेप करून या लाजीरवाण्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार की अजून एखाद्या अनर्थाची वाट पाहणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments