मारेगाव तालुक्यात प्रतिबंधित 'चोरबीटी' बियाण्यांचा सुळसुळाट!
कृषी अधिकाऱ्यांच्या कथित अर्थपूर्ण डोळेझाकपणाविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; 'या' ११ गावांमध्ये तस्करांचे जाळे
मारेगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे प्रतिबंधित असलेल्या 'H.T.B.T.' (चोरबीटी) कापूस बियाण्यांची मारेगाव तालुक्यात सर्रास वाहतूक व विक्री सुरू आहे. स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कथित 'चिरमिरी'पोटी या तस्करांना पाठीशी घालत असल्याचा खळबळजनक आरोप करत मारेगाव येथील सुज्ञ नागरिकांनी थेट जिल्हा कृषी अधिकारी, यवतमाळ यांच्याकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे. यामुळे कृषी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मारेगाव येथील जागरूक नागरिक विलास रायपुरे व गजानन चंदनखेडे यांनी १८ मे रोजी जिल्हा प्रशासनाला हे निवेदन सादर केले.
तस्करांचे जाळे अकरा गावांमध्ये! तालुक्यात कापूस हे मुख्य नगदी पीक आहे. शेतकरी ऐन खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीत व्यस्त असताना, अधिक उत्पादनाचा खोटा गैरसमज पसरवून तस्कर सक्रिय झाले आहेत. निवेदनानुसार, मारेगाव शहरासह तालुक्यातील चिंचाळा, आकापूर, वनोजादेवी, मार्डी, नवरगाव, चिंचमंडळ, वेगाव, बोटोणी, मदनापूर, कोथुर्ला आणि कुंभा या गावांमध्ये या बोगस बियाण्यांची छुपी विक्री राजरोसपणे सुरू आहे.
कृषी विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह! वारंवार माहिती देऊनही स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुंभकर्णी झोपेत सोंग घेऊन गप्प बसल्याचा आरोप विलास रायपुरे, व गजानन चंद्रखेडे यांनी केला आहे. प्रतिबंधित बियाण्यांमुळे कापूस उत्पादनात घट होऊन शेतकरी कर्जबाजारी होत आहे. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांची चौकशी करून, तालुक्यात युद्धपातळीवर धाडसत्र राबवावे आणि मारेगाव तालुका 'बोगस बियाणेमुक्त' करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीसोबत छुप्या मार्गाने आलेल्या बियाण्यांच्या पाकिटांचे फोटोही जोडण्यात आले आहेत.
0 Comments