मारेगाव: तहसीलदार आणि पत्रकार संघाच्या प्रयत्नाने ८० वर्षीय वृद्धेचे उपोषण सुटले!

मारेगाव: तहसीलदार आणि पत्रकार संघाच्या प्रयत्नाने ८० वर्षीय वृद्धेचे उपोषण सुटले!




मारेगाव (सचिन मेश्राम)

प्रशासकीय अनास्थेच्या उन्हात होरपळणाऱ्या ८० वर्षीय कमल पेंदोर या माउलीला अखेर मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या रूपात न्यायाचा किरण दिसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिवाची बाजी लावून उपोषणाला बसलेल्या या वृद्धेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदारांनी स्वतः पुढाकार घेतला. "पुढील सात दिवसांत दोन्ही पक्षांचे निकाल आणि कागदपत्रे तपासून कायदेशीर न्याय दिला जाईल," या ठोस आश्वासनानंतर 'प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या' उपस्थितीत हे उपोषण सोडवण्यात आले.

कायदेशीर पेच अन् तहसीलदारांची तत्परता

​मौजा बोटोणी येथील जमिनीचा हा वाद न्यायालयीन गुंतागुंतीत अडकला होता. दोन्ही बाजूंकडे वेगवेगळे निकाल असल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, तहसीलदार उत्तम निलावाड यांनी या प्रकरणात केवळ अधिकारी म्हणून नाही, तर एक संवेदनशील लोकसेवक म्हणून हस्तक्षेप केला. दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बोलावून, त्यांच्याकडील पुराव्यांची सखोल पडताळणी करून सात दिवसांच्या आत दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तहसीलदारांच्या या 'पारदर्शक' कार्यपद्धतीमुळेच आंदोलनाचा तिढा सुटला.

लोकशाहीचा चौथा स्तंभ ठरला आधार

​या संपूर्ण लढ्यात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने महत्त्वाची भूमिका बजावली. ८० वर्षांची वृद्ध महिला ४२ अंश तापमानात न्यायासाठी बसलेली असताना, पत्रकार संघाने प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. तहसीलदारांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे अखेर एका अनर्थाला पूर्णविराम मिळाला.

यांच्या उपस्थितीत सुटले उपोषण

​तहसीलदार उत्तम निलावाड यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन माउलीचे सांत्वन केले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मारेगाव तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, शेषराज मडावी, पंकज नेहारे, रवी घुमे सुमित गेडाम यांच्यासह प्रशासकीय चमुतील प्रशांत ढंगारे, राजेंद्र दिघाडे, विजय कन्नाके, महादेव सिडाम, भास्कर सिडाम आणि छाया तिरणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जनतेतून कौतुकाचा वर्षाव

​एकीकडे भूमी अभिलेख कार्यालयाने दाखवलेल्या वेळकाढूपणामुळे संताप व्यक्त होत असताना, दुसरीकडे तहसीलदार निलावाड यांनी दाखवलेली कार्यतत्परता आणि 'पत्रकार सेवा संघाने' दिलेली साथ यामुळे मारेगाव तालुक्यात माणुसकीचे दर्शन घडले आहे. आता सात दिवसांत होणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments