ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी ‘भारत बंद’; मारेगाव तालुक्यातील दुकाने राहणार बंद
तहसीलदार, ठाणेदारांना केमिस्ट असोसिएशनचे निवेदन; १९ मेपूर्वी औषधे खरेदी करण्याचे आवाहन
मारेगाव | प्रतिनिधी
ऑनलाइन औषध विक्रीच्या वाढत्या प्रवाहामुळे रुग्ण आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप करत, ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने बुधवारी (२० मे) रोजी देशव्यापी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, तालुक्यातील सर्व औषध दुकाने दिवसभर बंद राहणार आहेत.
ऑनलाइन विक्रीचा सामाजिक आरोग्याला धोका
ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या औषध विक्रीवर सरकारचे कोणतेही प्रभावी नियंत्रण नाही. औषधांची गुणवत्ता, साठवणूक आणि मुदतबाह्य तारखांबाबत ऑनलाइन कंपन्यांकडून अनेकदा नियमांचे उल्लंघन होते. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय (Prescription) औषधे उपलब्ध होत असल्याने नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा गैरवापर वाढला आहे, असा खळबळजनक आरोप संघटनेने केला आहे.
स्थानिक व्यावसायिकांचे अस्तित्व धोक्यात
ऑनलाइन कंपन्यांच्या अघोषित स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील छोट्या औषध विक्रेत्यांसमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. यामुळे बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त होत असून, सरकारने यावर तातडीने निर्बंध न घातल्यास भविष्यात बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही औषध विक्रेत्यांनी दिला आहे.
प्रशासनाला दिले निवेदन
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक तहसीलदार आणि ठाणेदार यांना मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनात ऑनलाइन औषध विक्रीवर तातडीने बंदी घालण्याची किंवा कठोर नियमावली लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन:
"२० मे रोजी होणाऱ्या लाक्षणिक बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांनी आपली आवश्यक औषधे १९ मेपूर्वीच खरेदी करून ठेवावीत."
— दुश्यंत जयस्वाल (अध्यक्ष, मारेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन)
यावेळी सचिव निलेश जुमडे, कोषाध्यक्ष कैलास ठेंगणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रवीण कुचनकर, कार्तिक शेंडे व अन्य सदस्य उपस्थित होते.
0 Comments