वणी-मारेगाव रस्त्यावर भीषण अपघात; मारेगावचे सचिन देवाळकर जागीच ठार!
मारेगाव:वणी-मारेगाव रस्त्यावरील निंबाळा रोडवर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात मारेगाव येथील एका ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज, मंगळवार दिनांक १९ मे रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. सचिन जगन देवाळकर (वय ३७, रा. मारेगाव) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे मारेगाव शहरात शोककळा पसरली आहे.
चंद्रपूर येथील कंपनीत कार्यरत होते सचिन
मृतक सचिन देवाळकर हे मूळचे मारेगाव येथील रहिवासी असले, तरी सध्या ते चंद्रपूर येथील एका कंपनीमध्ये नोकरीला होते आणि नोकरीनिमित्त सध्या ते चंद्रपूर येथेच राहत होते. आज रात्री ते आपल्या चारचाकी वाहनाने वणी-मारेगाव निंबाळा रोडवरून जात असताना हा काळाचा घाला आला.
ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, निंबाळा रोडवर समोरून जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात सचिन यांच्या चारचाकी वाहनाची समोरून येणाऱ्या वेगवान पिकअप वाहनाशी अत्यंत भीषण समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, सचिन यांच्या वाहनाचा पुढच्या भागाचा पुरता चक्काचूर झाला. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने सचिन देवाळकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मारेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह दाखल
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सचिन यांचा मृतदेह अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. सध्या त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ठेवण्यात आला आहे.
"वय जाण्याचे नव्हते अन् काळाने झडप घातली..." कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
मृतक सचिन देवाळकर हे अत्यंत मनमिळावू आणि उमद्या स्वभावाचे होते. अवघे ३७ वर्षे वय असलेल्या सचिन यांचे हे वय जगातून जाण्याचे नव्हते, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संसाराला आकार देण्याच्या वयातच नियतीने त्यांच्यावर हा भीषण घाला घातला. त्यांच्या अशा अकाली जाण्याने "हे वय जाण्याचे नव्हते" अशीच भावनिक प्रतिक्रिया मारेगाव परिसरातून उमटत असून संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा आप्तपरिवार मागे आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा असा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने देवाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत
0 Comments