भ्रष्ट कारभाराचा 'करेक्ट कार्यक्रम'; वनोजादेवीच्या सरपंचांची हकालपट्टी!
उपसरपंच प्रशांतकुमार भंडारींचा कायद्याचा दणका; स्वतः खटला लढवून सरपंचांना दाखवलं घर!
मारेगाव (यवतमाळ): सचिन मेश्राम
सत्तेचा माज, आर्थिक अफरातफर आणि कायद्याला धाब्यावर बसवून मनमानी कारभार करणाऱ्या वनोजादेवीच्या सरपंच सौ. डिमन गोवर्धन टोंगे यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा दणका दिला आहे. उपसरपंचांनी पुराव्यानिशी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे अखेर सरपंचांची खुर्ची गेली असून, त्यांना सरपंच पदावरून अपात्र (पद रद्द) ठरवण्यात आले आहे.
स्वतः 'वकील' बनून उपसरपंचांनी उधळला भ्रष्टाचाराचा पाढा
या प्रकरणातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, उपसरपंच प्रशांतकुमार प्रकाशचंदजी भंडारी यांनी कोणतीही मोठी फौज न घेता हा कायदेशीर लढा स्वतः लढला. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी सरपंचांच्या कारभाराचे वाभाडे काढले, ज्यामुळे सरपंचांना बचावाची संधीच उरली नाही.
हे आहेत हकालपट्टीला कारणीभूत ठरलेले 'काळे' कारनामे:
- पैशांची चावी आणि अफरातफर: ग्रामपंचायतीच्या 'आरो' (RO) प्लांटच्या पैशांची चावी स्वतःच्या खिशात ठेवून त्यातील रकमेची सर्रास अफरातफर करणे.
- साहित्याची चोरी: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या साहित्यावर डल्ला मारणे.
- पतीचा बेकायदेशीर हस्तक्षेप: निवडून आलेल्या सरपंचांऐवजी त्यांचे पती गोवर्धन टोंगे हेच ग्रामपंचायतीचा कारभार हाकणे आणि सदस्यांना धमकावणे.
- सदस्यांना कचरा समजणे: निवडून आलेल्या इतर सदस्यांना कोणत्याही निर्णयात विश्वासात न घेता केवळ मनमानी करणे.
- कायद्याची पायमल्ली: दरमहा अनिवार्य असलेली मासिक सभा (फेब्रुवारी २०२३) न घेणे आणि खोटी कागदपत्रे सादर करण्याचा प्रयत्न करणे.
जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक निकाल
अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी सर्व पुरावे आणि उपसरपंच भंडारी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३६ नुसार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सरपंचांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे ताशेरे ओढत त्यांना अपात्र घोषित केले.
थेट इशारा: हा निकाल म्हणजे जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या आणि लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या इतर सरपंचांसाठी एक जळजळीत इशारा आहे