धम्म परिषदेत डॉ. शितल मडावी यांचा 'सावित्रीबाई फुले' पुरस्काराने गौरव​

धम्म परिषदेत डॉ. शितल मडावी यांचा 'सावित्रीबाई फुले' पुरस्काराने गौरव

​प्रख्यात साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते सन्मान; यवतमाळ जिल्ह्यात आनंदाचे वातावरण


​यवतमाळ/किनवट:
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. शितल चंद्रशेखर मडावी यांना किनवट येथे आयोजित धम्म परिषदेत मानाच्या 'सावित्रीबाई फुले' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रख्यात साहित्यिक, विचारवंत तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. उत्तम कांबळे यांच्या शुभहस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला.
​डॉ. शितल मडावी यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदी निवड झाली आहे. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत त्यांनी राज्यस्तरीय क्षेत्रातून प्रथम क्रमांकाची मते मिळवून प्रचंड विजय संपादन केला होता. त्यांच्या या यशाची आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
​या सोहळ्याप्रसंगी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. डॉ. मडावी यांच्या या बहुमानाबद्दल प्रख्यात साहित्यिक व विचारवंत मा. बाबारावजी मडावी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.