🌳🔥 निसर्गाच्या कुशीत ‘घनवन’चा धडा; बोटोनी विद्यार्थ्यांची पर्यावरणासाठी शपथ!

🌳🔥 निसर्गाच्या कुशीत ‘घनवन’चा धडा; बोटोनी विद्यार्थ्यांची पर्यावरणासाठी शपथ! 🔥🌳
‘चला जाऊया वनाला’ उपक्रमात ५५ विद्यार्थ्यांचा सहभाग; अटल आनंद वनात प्रत्यक्ष निसर्गानुभव

पांढरकवडा पर्यावरण संवर्धनाची हाक देत बोटोनी येथील कै. बालाजी पंत चोपने विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी ‘चला जाऊया वनाला’ या उपक्रमांतर्गत अटल आनंद वन (घन वन) रोपवनाला भेट देत निसर्गाच्या शाळेत थेट धडे घेतले.

सामाजिक वनीकरण परीक्षेत्र वणी यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात तब्बल ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत ३ शिक्षक व २ शिक्षिका उपस्थित होत्या. शहरीकरणाच्या वाढत्या विळख्यात हरवणारे निसर्गाशी असलेले नाते पुन्हा दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
वनपाल माधुरी पडोळे यांनी विद्यार्थ्यांना विविध औषधी वनस्पतींची माहिती देत त्यांच्या घरगुती उपचारांतील उपयोगावर प्रकाश टाकला. तर वनरक्षक उषा बोन्डे यांनी रोपवन व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन आणि झाडांची निगा राखण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी संपूर्ण रोपवनात फेरफटका मारत विविध झाडे-पानांची ओळख करून घेतली. झाडांच्या सावलीत बसून ‘जंगल वाचले तरच माणूस वाचेल’ हा संदेश त्यांनी मनावर कोरला. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष निसर्गाचा अनुभव घेताना विद्यार्थी भारावून गेले होते.
परिसरात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे भावी पिढीमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता व वृक्षसंवर्धनाची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
निसर्गाशी नाळ जपण्यासाठी अशीच उपक्रमांची साखळी सुरू राहणे हीच काळाची गरज आहे!