​लहान वयात मोठा संयम; अर्श सय्यदचा पहिला रोजा ठरला प्रेरणादायी!

​लहान वयात मोठा संयम; अर्श सय्यदचा पहिला रोजा ठरला प्रेरणादायी!

सचिन मेश्राम -मारेगाव 

​मारेगाव (प्रतिनिधी): पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण भक्तीभावाने रोजा पाळत आहेत. मारेगाव येथील प्रभाग क्रमांक ९ मधील नऊ वर्षीय चिमुरडा अर्श नईमुद्दीन सय्यद याने कडक उन्हाळ्याची तमा न बाळगता आपला पहिला रोजा अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात पूर्ण केला.
​संयम, भक्ती आणि सामाजिक प्रार्थनेचा आदर्श
​सध्या उन्हाचा पारा वाढत असताना दिवसभर अन्न-पाण्याविना राहणे मोठे कठीण असते. मात्र, अर्शने आपल्या लहान वयातही कमालीचा संयम आणि धार्मिक कर्तव्याची जाणीव दाखवली. अर्शने केवळ उपवासच केला नाही, तर "देशात सर्व समाज एकोपा, शांती आणि समाधानाने नांदो तसेच बळीराजाला (शेतकऱ्यांना) चांगले दिवस येवोत," अशी उदात्त प्रार्थनाही केली. त्याच्या या विचारांनी परिसरात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
​परिसरात कौतुकाचा वर्षाव
​अर्शच्या या जिद्दीचे आणि धार्मिक संस्कारांचे मारेगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. इफ्तारनंतर मान्यवर आणि नातेवाईकांनी त्याचे विशेष अभिनंदन केले. "रमजान महिना हा त्याग आणि आत्मशुद्धीचा काळ आहे, अर्शने या वयात दिलेले हे उदाहरण समाजासाठी प्रेरणादायी आहे," अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
​मान्यवरांची उपस्थिती
​याप्रसंगी अर्शचे कौतुक करण्यासाठी त्याचे माता-पिता नईमुद्दीन सय्यद व रुबीना सय्यद, तसेच राॅयल सय्यद, इमरान शेख, परवेज शेख, सोहेल सय्यद आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी अर्शला त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या