ईद-ए-मिलादुन्नबी : सर्वसमावेशक बंधुभाव आणि समतेची शिकवण- ॲड. साहिल खलील शेख

ईद-ए-मिलादुन्नबी : सर्वसमावेशक बंधुभाव आणि समतेची शिकवण- ॲड. साहिल खलील शेख

दरवर्षी साजरा होणारा 'ईद-ए-मिलादुन्नबी' हा केवळ एका धार्मिक उत्सवापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण मानवजातीला समता, न्याय आणि करुणेचा मार्ग दाखवणारा दिवस आहे. पैगंबर हजरत मोहम्मद (स. अ. व. सं.) यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या उच्च नैतिक मूल्यांचे आणि सामाजिक समतेच्या विचारांचे आचरण करणे हीच काळाची खरी गरज आहे.
पैगंबर हजरत मोहम्मद (स. अ. व. सं.) यांचा जीवनप्रवास हा मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करणारा ठरला. ज्या काळात समाज अज्ञान, विषमता, सामाजिक अन्याय आणि अनिष्ट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकला होता, त्या काळात त्यांनी मानवी सन्मान, बंधुभाव आणि समानतेचा संदेश दिला. कोणत्याही व्यक्तीची श्रेष्ठता त्याच्या जाती, रंग, भाषा किंवा संपत्तीवर नव्हे, तर त्याच्या चारित्र्य, नैतिकता आणि सत्कर्मावर ठरते, हा विचार त्यांनी ठामपणे मांडला.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने मशिदींमध्ये होणारे पठण, प्रबोधनपर कार्यक्रम आणि मिरवणुका या उत्सवाचा बाह्य भाग असल्या, तरी या उत्सवाचा खरा गाभा त्यांच्या शिकवणीचे आचरण करण्यात दडला आहे. पैगंबरांनी दिलेला संदेश कोणत्याही एका विशिष्ट घटकापुरता मर्यादित नसून, संपूर्ण विश्वातील मानवतेच्या कल्याणासाठी मार्गदर्शक आहे. भुकेलेल्याला अन्न देणे, दुर्बल व वंचितांना आधार देणे, शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवणे आणि न्यायाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे हीच खरी समाजसेवा आणि भक्ती आहे.
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात मानवाला भौतिक सुखसोयी उपलब्ध असल्या, तरी समाजात मानसिक अस्वस्थता, तेढ आणि विषमतेचे वातावरण जाणवते. अशा परिस्थितीत संयम, सहिष्णुता, परस्पर आदर आणि दयाभाव या मूल्यांची नितांत आवश्यकता आहे. पैगंबरांचे जीवन हे दाखवून देते की, कठीण प्रसंगातही शांततेचा आणि संवादाचा मार्ग सोडू नये.
हा सण केवळ रोषणाई किंवा औपचारिकता म्हणून न पाहता, समाजात बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि नैतिक आचरण वृद्धिंगत करण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. समाजातील उपेक्षित घटकांना सोबत घेऊन चालणे आणि सत्याचा मार्ग स्वीकारणे हीच पैगंबरांना खरी आदरांजली ठरेल.
(लेखक उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे विधिज्ञ आहेत.)
मो. [7020543187]

Post a Comment

0 Comments