मारेगावात आज ‘ज्ञान माऊली’ भव्य सांस्कृतिक सोहळा

मारेगावात आज ‘ज्ञान माऊली’ भव्य सांस्कृतिक सोहळा




मारेगाव | सचिन मेश्राम 

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जन्मजयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आज, रविवार, २३ ऑगस्ट रोजी मारेगाव येथे ‘ज्ञान माऊली’ या तालुकास्तरीय सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. घोन्सा रोडवरील बदकी भवन येथे सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यगीत, दीपप्रज्वलन व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच माऊलींच्या जीवनकार्यावर आधारित ध्वनीचित्रफीत दाखविण्यात येणार आहे.
सोहळ्यात शास्त्रीय व वारी नृत्य, नाट्यप्रवेश, ज्ञानेश्वरी लेखन प्रसंग, अभंग, विराणी, भावपूर्ण हरिपाठ, संत नामदेव-संत ज्ञानेश्वर भेट तसेच संजीवन समाधी सोहळ्याचे सादरीकरण होणार आहे. यासोबतच ज्ञानेश्वर माऊलींचे पर्यावरणविषयक विचार आणि नाथ-वारकरी परंपरेचा अनुबंधही कलाविष्कारातून मांडला जाणार आहे.
कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून तालुक्यातील वारकरी बांधव, नागरिक, साहित्य व कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Post a Comment

0 Comments