भक्तीतून समाज घडवणारी पाऊले: करनवाडीच्या शुभांगी काळे यांची मारेगाव तालुका महिला अध्यक्षपदी निवड
मारेगाव : सचिन मेश्राम
वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा केवळ परंपरेपुरता मर्यादित न ठेवता, त्यातून भावी पिढीवर सुसंस्कार घडवणाऱ्या करनवाडी येथील शुभांगी श्रीधर काळे यांची वारकरी संप्रदायाच्या मारेगाव तालुका महिला अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली आहे. वेगाव येथील प्रसिद्ध संत जगन्नाथ महाराज देवस्थानच्या पावन प्रांगणात आयोजित विशेष सोहळ्यात त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
माहेर आणि सासरचा समृद्ध वारसा
शुभांगी काळे यांना वारकरी परंपरेचे बाळकडू माहेर आणि सासर अशा दोन्ही सुसंस्कृत घराण्यांतून लाभले आहे. माहेरी वडील रामकृष्ण राजुरकर व आई वेणूबाई राजुरकर यांच्या संस्कारात वाढलेल्या शुभांगीताईंना, सासरी कीर्तनकार सासू-सासऱ्यांच्या सहवासात भक्तीचा अखंड सहवास लाभला. विठ्ठलचरणी समर्पित भावनेने सेवा करत त्यांनी भजन व कीर्तनाची परंपरा सातत्याने पुढे नेली आहे.
गावात रुजवले संस्कारांचे रोपटे
करनवाडीत पार पडलेल्या भागवत सप्ताहातील हरिपाठ दिंड्यांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी गावात स्वयंप्रेरणेने हरिपाठ वर्गाची सुरुवात केली. आज त्यांच्या प्रेरणेतून गावातील २५ महिला, ७ मुले आणि १० चिमुकल्या मुली नियमितपणे हरिपाठाचे धडे घेत असून, गावात एक चैतन्यमय व संस्कारक्षम वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्याची दखल घेत वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ प्रचारक व मान्यवरांनी त्यांच्या संघटन कौशल्याचे विशेष कौतुक केले असून, संपूर्ण मारेगाव तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments