मारेगावात वीजपुरवठ्याचा लपंडाव; शेतकरी, नागरिक त्रस्त; भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा

मारेगावात वीजपुरवठ्याचा लपंडाव; शेतकरी, नागरिक त्रस्त; भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा



मारेगाव: सचिन मेश्राम 

मारेगाव तालुक्यात महावितरणच्या गलथान कारभारामुळे सुरू असलेल्या वारंवार वीज कपातीमुळे शेतकरी व नागरिक मेटाकुटीला आले आहेत. या विस्कळीत वीजपुरवठ्या विरोधात भारतीय जनता पार्टी, मारेगाव तालुक्याच्या वतीने कार्यकारी अभियंता, महावितरण यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

खरीप हंगाम संकटात

सध्या खरीप हंगाम सुरू असून पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांना सिंचनाची नितांत गरज आहे. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विहीर व बोअरवेलद्वारे पाणी देणे कठीण झाले आहे. यामुळे पिके सुकण्याची भीती निर्माण होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतीसोबतच लघुउद्योजक आणि दुकानदारांनाही वीज पुरवठा विस्कळीत झाल्याचा मोठा फटका बसत आहे.



‘अखंडित वीज द्या, अन्यथा मोर्चा’

महावितरणच्या या गलथान कारभाराची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी प्रशासनाला खडसावले आहे. “तालुक्यातील वीजपुरवठा त्वरित सुरळीत व अखंडित करावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात शेतकरी, नागरिक व कार्यकर्त्यांसह महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन आणि मोर्चा काढला जाईल,” असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

​प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन दिलासा द्यावा, अन्यथा होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित प्रशांत नांदे, अमोल कुमरे, पवन ढवस, मारोती गौरकार, गणेश खुशबुरे,मंजुषा बोढाले, शोभाताई नक्षणे, माला गौरकार, दिपिका रसे यासह अनेक कार्यकर्ते सह शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments