मौत का सौदागर': 'लाला'च्या विषारी दारूच्या धंद्यावर तुकाराम मुंढे यांची नजर कधी पडणार?

मौत का सौदागर': 'लाला'च्या विषारी दारूच्या धंद्यावर तुकाराम मुंढे यांची नजर कधी पडणार?


मारेगाव तालुक्यातील एका गावात गेल्या २८ वर्षांपासून एका व्यक्तीद्वारे (स्थानिक 'लाला') केमिकल आणि घातक पावडरपासून तयार केलेली 'विषारी' दारू सर्रास विकली जात आहे. विशेष म्हणजे, ही विषारी दारू तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सक्रियपणे विकली जात असून, हा केवळ दारूचा अवैध धंदा नसून ग्रामीण भागातील लोकांच्या जिवाशी खेळणारा एक 'मृत्यूचा सापळा' आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या या भीषण प्रकाराने संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.

मौत का सौदागर 'लाला' आणि प्रशासनाची नामर्द भूमिका

ही व्यक्ती आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारची घातक रसायने मिसळून दारू बनवते, याचे कसलेही नियंत्रण नाही. या विषारी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, पण संबंधित पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला जणू 'कुंभकर्णाची झोप' लागली आहे. जनतेने यापूर्वी दोनदा या गुन्हेगाराला चोप दिला, दोन ठिकाणी त्याचे दुकान बंद पाडले, तरीही 'लाला'ची मुजोरी कायम आहे. यावरून स्पष्ट होते की, या अवैध धंद्याला कोणाचा तरी वरदहस्त आहे, ज्याच्या जोरावर हा 'मौत का सौदागर' बिनधास्त दारू पाजत आहे.



तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाईची तीव्र अपेक्षा

प्रशासकीय शिस्तीसाठी ओळखले जाणारे धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी आर्त हाक आता तालुक्यातील जनता घालत आहे. या 'विषारी' साम्राज्याचा आणि दोन्ही ठिकाणच्या अवैध विक्रीचा नायनाट करण्यासाठी केवळ मुंढेच सक्षम आहेत, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. त्यांच्याकडून आता लवकरात लवकर आणि कठोर कारवाई होईल, अशी प्रबळ आशा मारेगाव तालुक्यातील जनतेला आहे. भ्रष्ट व्यवस्थेला चपराक लावणारी ही कारवाई तालुक्यात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

‘मारेगाव वार्ता’चे जनतेला खणखणीत आवाहन

विषारी दारू म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे! ‘मारेगाव वार्ता’च्या वतीने तमाम नागरिकांना कळकळीचे आवाहन करण्यात येते की, अशा घातक पावडर मिश्रित दारूच्या नादी लागून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. लक्षात ठेवा, "आपले आरोग्य सुरक्षित, तर आपले कुटुंब संरक्षित!"

प्रशासनाला खडा सवाल:

२८ वर्षांपासून सुरू असलेला हा विषारी दारूचा कारखाना आणि दोन ठिकाणची विक्री शोधण्यात यंत्रणा अपयशी का ठरली? नागरिकांनी दोनदा चोप दिल्यावरही या गुन्हेगारावर कडक कारवाई का केली जात नाही?केमिकल मिश्रित दारूच्या बळींची जबाबदारी कोण घेणार?

Post a Comment

0 Comments