ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्यस्तरीय अधिवेशन उद्या छत्रपती संभाजी नगरमध्ये; विविध प्रश्नांवर होणार चर्चा

ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्यस्तरीय अधिवेशन उद्या छत्रपती संभाजी नगरमध्ये; विविध प्रश्नांवर होणार चर्चा


अर्पित वाहाणे, वर्धा 

छत्रपती संभाजी नगर:महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन उद्या, २० जून रोजी दुपारी २ वाजता लाडगाव येथील आदिती लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे आयोजन युनियनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश दाभाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

या महत्त्वाच्या अधिवेशनाला राज्याच्या सत्ताधारी मंडळातील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार तथा युनियनचे राज्याध्यक्ष बच्चू कडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच युनियनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश दाभाडकर आणि राज्य कार्याध्यक्ष काझी अल्लादिन यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर होणार मंथन

या अधिवेशनात राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या अडीअडचणी शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

आर्वी तालुक्यातील कर्मचाऱ्यांना आवाहन

या राज्यस्तरीय अधिवेशनास आर्वी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे आर्वी तालुकाध्यक्ष योगेश हरणखेडे आणि प्रतिनिधी अर्पित वाहाणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments