गणेशपूर येथे शेतकऱ्यांना डिजिटल कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

गणेशपूर येथे शेतकऱ्यांना डिजिटल कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन



अर्पित वाहाणे, वर्धा 

दारव्हा (वर्धा) : येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत गणेशपूर येथील शेतकऱ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या उपक्रमात शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून शेतीविषयक सरकारी योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यात आले.

​यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलचा वापर करून अनुदानासाठी अर्ज कसा करावा, अर्जाची स्थिती कशी तपासावी आणि पीक विमा, हवामान अंदाज तसेच बाजारभावांची माहिती मोबाईलवर कशी मिळवावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. तसेच, आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचे फायदे आणि ती वापरण्याच्या योग्य पद्धतींची माहिती व्हिडिओद्वारे कशी पाहावी, हेही शिकवण्यात आले. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे विद्यार्थ्यांनी या वेळी सांगितले.

​या उपक्रमात महाविद्यालयातील खुशबू साखरकर, कल्याणी सवाईशाम, साक्षी शेंदुरकर, श्रेया ताजणे, धनश्री विधाते आणि प्रेरणा वाढवे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाला गावातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज ए. खाडे, विषय विशेषज्ञ प्रा. अघम आणि कार्यक्रम प्रभारी प्रा. देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.

Post a Comment

0 Comments