पैशांच्या जोरावर कायद्याची एैसीतैसी?; 'लाला' विकतोय विषारी दारू, पोलीस प्रशासन मात्र 'कुंभकर्णी' झोपेत!


पैशांच्या जोरावर कायद्याची एैसीतैसी?; 'लाला' विकतोय विषारी दारू, पोलीस प्रशासन मात्र 'कुंभकर्णी' झोपेत!




मारेगाव तालुक्यात 'लाला' नावाच्या व्यक्तीने सुरू केलेल्या अवैध दारूविक्रीचा विळखा आता जीवघेणा ठरत आहे. 'लाला'द्वारे विक्री केली जाणारी 'पावडरची देशी दारू' आरोग्यासाठी अत्यंत घातक असून, याच दारूमुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. या घटनेने नागरिक संतप्त असूनही, स्थानिक पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र अद्याप 'कुंभकर्णी झोपेतून' जागे व्हायला तयार नसल्याचे चित्र आहे.

काय आहे 'पावडरची देशी दारू'चे प्रकरण?

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, 'लाला'ने आपल्या अवैध व्यवसायासाठी रासायनिक पावडरचा वापर करून तयार केलेली देशी दारू बाजारात उतरवली आहे. ही दारू पिणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. ३० मे रोजी घडलेली मृत्यूची घटना याच विषारी दारूच्या सेवनामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा केवळ अवैध धंदा नसून निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, ज्याला कोणाचा तरी 'वरदहस्त' असल्याशिवाय इतक्या उघडपणे ही विक्री होणे अशक्य आहे.

प्रशासनाचा 'अर्थपूर्ण' मौन?

एका निष्पापाचा बळी गेल्यानंतरही मारेगाव पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाची ही 'अर्थपूर्ण' शांतता संशयाला वाव देत आहे. हा व्यवसाय प्रशासनाच्या आशीर्वादानेच सुरू आहे का? की 'लाला'च्या पैशांच्या जोरावर कायद्यालाच खरेदी केले गेले आहे? असे अनेक प्रश्न आता मारेगावकर उपस्थित करत आहेत.

आता लढा थेट तुकाराम मुंढे यांच्या दरबारी!

स्थानिक पातळीवर न्याय मिळण्याची आशा मावळल्याने, मारेगावचे जागरूक नागरिक आता या प्रकरणाची तक्रार थेट राज्याचे धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे करणार आहेत. दारू मुळे एकाचा बळी गेलेल्याने सखोल चौकशी करून, 'लाला'च्या अड्ड्याला टाळे ठोकण्याचे आणि त्याला साथ देणाऱ्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन जनतेला हवे आहे.

जनतेचा निर्वाणीचा इशारा:

"आमच्या तालुक्यात आणखी किती मृत्यू झाल्यावर प्रशासन जागे होणार? ३० मे रोजीचा बळी हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. 'लाला'च्या या विषारी धंद्याला आता कायमचा लगाम लावा, अन्यथा मंत्रालय स्तरावर या प्रकरणाचा भडका उडल्याशिवाय राहणार नाही," अशा शब्दांत नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments