मारेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ४५ अंश तापमानात गोवंशाची क्रूर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त
मारेगाव : सचिन मेश्राम
भीषण उन्हाच्या तडाख्यात मुक्या प्राण्यांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर मारेगाव पोलिसांनी गौराळा शिवारात कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ६० हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्तीवर होते. दरम्यान, गौराळा शिवारामध्ये दोन संशयास्पद वाहने थांबवून त्यांची तपासणी केली असता, त्यात ४ बैल अत्यंत निर्दयीपणे कोंबलेले आढळले. विदर्भात सध्या ४३ ते ४५ अंश सेल्सिअस तापमान असताना, या वाहनांवर सावलीसाठी साधे आच्छादनही नव्हते. तसेच जनावरांना आखूड दोरीने बांधून त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता ही वाहतूक केली जात होती.
याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठल लक्ष्मण वागदरकर (३९, रा. वरोरा), रत्नाकर मारोती वाकुळकर (४२, रा. टाकळी, जि. चंद्रपूर) आणि शनिदेवा शिवशंकर पांडे (२५, रा. वरोरा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड (MH 34 BZ 8489) आणि ३.५ लाख किमतीचे बोलेरो पिकअप (MH 34 AV 1037) यासह १ लाख १० हजार रुपयांचे ४ बैल, असा एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.उपनि. दिगांबर किनाके, पो.शि. सागर दिपेवार आणि नरेंद्र तुमराम यांनी केली. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
0 Comments