लाचखोरांना 'सलाम' आणि पत्रकारांना 'नोटीस'? मारेगाव ठाणेदाराविरुद्ध उद्यापासून 'आरपार'ची लढाई; "ठाणेदार हटवा, मारेगाव वाचवा"चा दिला नारा!

लाचखोरांना 'सलाम' आणि पत्रकारांना 'नोटीस'? मारेगाव ठाणेदाराविरुद्ध उद्यापासून 'आरपार'ची लढाई; "ठाणेदार हटवा, मारेगाव वाचवा"चा दिला नारा!

​मारेगाव : सचिन मेश्राम 

एका ९० हजार रुपयांच्या लाचखोर गुन्हेगाराच्या तक्रारीवरून पत्रकारांना बेकायदेशीर नोटीस बजावणाऱ्या मारेगाव पोलीस प्रशासनाविरुद्ध तालुक्यातील पत्रकारांनी आता 'आरपार'चा लढा पुकारला आहे. प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम संपला असून, उद्या सोमवारपासून मारेगाव पोलीस स्टेशनसमोर पत्रकारांचे 'बेमुदत आमरण उपोषण' सुरू होत आहे.




​सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांची पायमल्ली?
​पत्रकार संघाने ठाणेदारांना दिलेल्या कायदेशीर प्रत्युत्तरात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला दिला आहे. 'अर्णब गोस्वामी विरुद्ध भारत सरकार' आणि 'विनोद दुआ विरुद्ध भारतीय संघराज्य' या खटल्यांमधील निकालांनुसार, पत्रकारांना निर्भीडपणे पत्रकारिता करण्याचे स्वातंत्र्य आहे. या महत्त्वपूर्ण निकालांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मारेगाव पोलिसांनी बजावलेली नोटीस हा थेट 'न्यायालयीन अवमान' (Contempt of Court) असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
​लाचखोराचे ‘पोलीस संरक्षण’ आणि पत्रकारांची मुस्कटदाबी!
​एसीबीने रंगेहाथ पकडलेल्या एका भ्रष्ट प्रवृत्तीला मारेगाव पोलीस ज्या पद्धतीने झुकून सलाम करत आहेत आणि त्या गुन्हेगाराच्या सांगण्यावरून पत्रकारांना नोटीस बजावत आहेत, त्यामुळे संतापाची लाट आहे. डिजिटल न्यूज पोर्टलचे नियमन करण्याचे अधिकार पोलिसांना नसतानाही, हुकूमशाही पद्धतीने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.


​आता चर्चा नाही, थेट रणसंग्राम!
​साखळी उपोषणाचा मवाळ मार्ग आता मागे पडला असून उद्यापासून थेट 'आमरण उपोषण' सुरू होणार आहे. "जोपर्यंत त्या भ्रष्ट तक्रारदारावर BNS कलम २१७ व ३५६ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल होत नाही आणि पत्रकारांवर अन्याय करणाऱ्या ठाणेदाराची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही," अशी वज्रमुठ तालुक्यातील पत्रकारांनी बांधली आहे.
​"ठाणेदार हटवा, मारेगाव वाचवा!"



​मारेगाव तालुक्यातील जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेने या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. मारेगावची शांतता, सामाजिक सलोखा आणि पत्रकारितेचे स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या ठाणेदाराला पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी भावना व्यक्त करत पत्रकारांनी आता "ठाणेदार हटवा, मारेगाव वाचवा" ही मोहीम अधिक तीव्र केली आहे.
​प्रशासनाला व तक्रारदाराला अंतिम चेतावणी!
​उद्यापासून सुरू होणाऱ्या या लढाईत जर कोणत्याही पत्रकाराच्या आरोग्यास इजा पोहचली किंवा काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला सर्वस्वी जबाबदारी मारेगावचे ठाणेदार, पोलीस प्रशासन आणि तो भ्रष्ट तक्रारदार यांची राहील, असा इशारा पत्रकार संघाने दिला आहे. हा लढा आता मारेगावच्या स्वाभिमानाचा आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा बनला आहे.
​📍 स्थळ: पोलीस स्टेशन मारेगाव समोर.
📢 मुख्य नारा: "ठाणेदार हटवा, मारेगाव वाचवा!"
📢 घोषणा: "भ्रष्ट प्रशासन मुर्दाबाद! पत्रकारांवर अन्याय करणाऱ्यांचा धिक्कार असो!"

Post a Comment

0 Comments